महाराष्ट्र | महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यभरात विविध विभागांच्या माध्यमातून त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि परिवर्तनवादी विचारांचा प्रसार करणारे अनेक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. व्याख्यानमाला, ग्रंथवाचन, चित्रपट व माहितीपटांचे प्रसारण, निबंध-वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, कौशल्य विकास कार्यशाळा आणि पर्यावरणविषयक जनजागृती याद्वारे महात्मा फुले यांचे विचार समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला जात आहे.
शैक्षणिक, सांस्कृतिक आणि महिला सक्षमीकरण उपक्रम
शाळा, महाविद्यालये, शासकीय व सार्वजनिक ग्रंथालये तसेच शासकीय वसतिगृहांमध्ये महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित व्याख्याने, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, गीतगायन, रांगोळी स्पर्धा, प्रभातफेरी आणि पथनाट्यांचे आयोजन करण्यात येत आहे. ग्रंथालयांमध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या साहित्याची प्रदर्शने भरवली जाणार असून त्यांच्या विचारांवर आधारित सामूहिक वाचन व इतर कार्यक्रम घेतले जाणार आहेत. त्यांच्या जीवनकार्यावर माहितीपट व लघुचित्रफिती तयार करून समाजमाध्यमांसह विविध माध्यमांतून प्रसारित केल्या जातील. अंगणवाडी केंद्रांमध्ये बालकांना महात्मा फुले यांच्या कार्याची ओळख करून दिली जाईल. तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव आणि विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे.
कौशल्य विकास, कृषी, पर्यावरण आणि महसूल अभियान
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून ‘महात्मा फुले तांत्रिक प्रदर्शनी’ आणि ‘सत्यशोधक’ या संकल्पनांवर आधारित उपक्रम राबवले जातील. यात तांत्रिक प्रकल्प स्पर्धा आणि ग्रामीण व दुर्गम भागातील बेरोजगार युवक व महिलांसाठी उद्योजकता कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत. पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत कृषी विद्यापीठांच्या सहकार्याने शाश्वत शेती व जलसंवर्धनविषयक परिषदा होणार असून ग्रामीण भागात पथनाट्यांचे सादरीकरण करून जनजागृती केली जाईल. याशिवाय, महसूल महिपार्फत ‘महात्मा जोतीराव फुले महसूल अभियान’ राबवून मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी स्तरावरील न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या विविध महसुली दाव्यांचा व अपिलांचा निपटारा केला जाणार आहे तसेच लोकअदालती भरवल्या जातील.
Source: Cosmo News Desk











