मुंबई | राज्यातील पात्र वनपट्टेधारकांचे वैयक्तिक व सामूहिक वनहक्क दावे अंतिम करण्यासह मंजूर वनपट्टे वाटपाची विशेष मोहीम आता १५ डिसेंबर २०२६ पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात महसूल विभागाने अधिकृत परिपत्रक निर्गमित केले असून, सर्व स्तरांवर प्रलंबित असलेले वनहक्क दावे वेळेत निकाली काढून पात्र लाभार्थ्यांना वनहक्क अभिलेख उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विशेष कालबद्ध वनहक्क मोहीम राबविण्यात आली होती. मात्र, दावे अंतिम करण्याची प्रक्रिया आणि मंजूर पट्टे वाटपाची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी हा कालावधी वाढविण्यात आला आहे.
प्रलंबित दाव्यांची तपासणी आणि फेरआढावा
या विस्तारित मोहिमेमध्ये ग्रामस्तरीय, उपविभागस्तरीय आणि जिल्हास्तरीय वनहक्क समित्यांकडे प्रलंबित असलेले सर्व वैयक्तिक व सामूहिक वनहक्क दावे समाविष्ट केले जाणार आहेत. संबंधित समित्यांना दाव्यांची अभिलेखीय तपासणी, आवश्यक स्थळपडताळणी आणि कायद्यातील तरतुदींनुसार कार्यवाही करून निर्धारित मुदतीत निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय, यापूर्वी नामंजूर करण्यात आलेल्या वनहक्क दाव्यांची पुनर्तपासणी केली जाणार आहे. दावेदारांना नामंजुरीची कारणे सांगून अतिरिक्त पुरावे व आपले म्हणणे सादर करण्याची संधी दिली जाईल. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती या सर्व दाव्यांची तपासणी करून १५ डिसेंबरपर्यंत उचित निर्णय घेईल. गुणवत्तेवर निर्णय घेण्यासाठी उपग्रह छायाचित्रे तसेच वनहक्क कायदा व नियमांनुसार ग्राह्य असलेले वहिवाटीचे पुरावे विचारात घेतले जातील.
मंजूर वनपट्टे व अभिलेखांचे वितरण
या मोहिमेदरम्यान मंजूर झालेल्या पात्र वनहक्कधारकांची स्वतंत्र यादी तयार केली जाईल. महसूल व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयाने लाभार्थ्यांची नावे, मंजूर क्षेत्र, गट किंवा सर्व्हे क्रमांक आणि इतर अभिлеखांची अचूकता तपासून शासनाने निश्चित केलेल्या ७/ई व ७/उ किंवा १२/ई नमुन्यात वनहक्क अभिलेख तयार करण्याचे आदेश आहेत. पात्र वनहक्कधारकांना हे अभिलेख किंवा वनपट्टे १५ डिसेंबर २०२६ पर्यंत उपलब्ध करून दिले जातील. कायद्यातील तरतुदी व विहित कार्यपद्धतीचे पालन करून प्रलंबित अनुशेष कमी करणे आणि मंजूर धारकांना वेळेत कागदपत्रे देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
Source: Cosmo News Desk











