सोलापूर | महात्मा फुले यांच्या जयंतीचे सन २०२७ मध्ये २०० वे वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने द्विशताब्दी वर्षानिमित्त विविध उपक्रम व कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, राज्यातील सर्व शाळांमध्ये एप्रिल २०२६ ते एप्रिल २०२७ या कालावधीत वर्षभर विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. महात्मा फुले हे आधुनिक भारतातील सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, थोर समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांनी स्त्री शिक्षण, सामाजिक समता, शेतकरी कल्याण आणि सामाजिक न्यायासाठी मोलाचे कार्य केले. त्यांच्या विचारांचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा, तसेच संविधानिक मूल्ये, सामाजिक समता आणि लोकशाहीविषयक जाणीव विकसित व्हावी, या उद्देशाने हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या सर्व कार्यक्रमांची राज्यातील सर्व शाळांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी व विभागीय अधिकाऱ्यांनी नियोजन आणि संनियंत्रण करावे, असे निर्देश शासनाने दिले आहेत.
एप्रिल ते सप्टेंबर २०२६ मधील नियोजित उपक्रम
या उपक्रमांतर्गत २२ एप्रिल २०२६ रोजी महात्मा फुले जयंती उद्घाटन व प्रतिमा पूजन, विचार जनजागृती रॅली, शाळास्तरावर भित्तीचित्र अभियान आणि जीवनपरिचय आढावा यांचे आयोजन करण्यात येणार आहे. जून महिन्यात जलसंवर्धन अभियान, शेतकरी व जलव्यवस्थापनविषयक उपक्रम, बालसभा आणि शाळा स्वच्छता अभियान राबविण्यात येईल. जुलै महिन्यात समता कथा व चर्चा, महात्मा फुले लिखित अखंड पाठांतर स्पर्धा, गावांमध्ये समता भिंत उपक्रम आणि सामाजिक न्यायाचा संदेश देण्यासाठी समता दौड आयोजित केली जाणार आहे. ऑगस्ट महिन्यात वृक्षारोपण, देशभक्तीपर गीत कार्यक्रम, वक्तृत्व व प्रश्नमंजुषा स्पर्धा तसेच महात्मा फुले साहित्य वाचन अभियान राबविण्यात येईल. सप्टेंबरमध्ये शिक्षक गौरव, नवोपक्रम स्पर्धा आणि विज्ञान व माहिती-तंत्रज्ञानावर आधारित उपक्रम आयोजित केले जातील.
ऑक्टोबर २०२६ ते मार्च २०२७ मधील कार्यक्रम आणि उद्देश
ऑक्टोबर महिन्यात स्त्री सक्षमीकरण, भूमिका अभिनय, पोस्टर स्पर्धा आणि ‘महात्मा फुले शैक्षणिक प्रेरणा सप्ताह’ आयोजित करण्यात येणार आहे. नोव्हेंबरमध्ये संविधानावर आधारित पुस्तकांचे वाचन, नेतृत्व विकास आणि जनजागृती रॅली, तर डिसेंबरमध्ये सांस्कृतिक महोत्सव, चित्रकला स्पर्धा व लोककला सादरीकरण होणार आहे. जानेवारी २०२७ मध्ये प्रकल्पकार्य, स्थानिक इतिहास अभ्यास, मुलाखत उपक्रम व प्रदर्शन; फेब्रुवारीमध्ये वादविवाद, निबंध, प्रकल्प सादरीकरण आणि पोस्टर निर्मिती स्पर्धा आयोजित करण्यात येतील. मार्च २०२७ मध्ये समारोप कार्यक्रम, ‘फुले समता पुरस्कार’ वितरण, अनुभव लेखन आणि अहवाल सादरीकरण करण्यात येणार आहे. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, समता, पर्यावरणविषयक जागरूकता, नेतृत्व, सर्जनशीलता, संशोधन आणि अभिव्यक्ती कौशल्ये विकसित होण्यास मदत होणार आहे.
Source: Cosmo News Desk











