नाशिक | अंबड एमआयडीसी परिसरातील भूजल प्रदूषण, रासायनिक सांडपाणी आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीसंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अधिकाऱ्यांकडून कोणतीही समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांनी दिवाळीनंतर पिवळ्या पाण्याच्या कॅन हातात घेत शेतकरी नाशिक ते मुंबई मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिला आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या बैठकीत उपस्थित केलेले प्रश्न
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रणव पाखले व इतर अधिकारी उपस्थित होते. तसेच प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर, विष्णू जमदाडे, गोरख दातीर, रामदास दातीर, अरुण दातीर, शरद कडर्ले, बडोपंत दातीर, शांताराम दातीर, ज्ञानेश्वर आहेर, अविनाश टिळे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. बैठकीत परिसरातील भूजलात मिसळलेल्या रासायनिक सांडपाण्याचा निचरा कसा केला जाणार, यासाठी कोणत्या कंपन्या जबाबदार आहेत आणि त्यांच्यावर कोणती कारवाई होणार, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले.
दूषित भूजल आणि रासायनिक सांडपाण्याचा संपूर्ण अहवाल तातडीने जाहीर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सीईटीपी (कॉमन इफ्फ्लुअंट ट्रीटमेंट प्लांट) नेमका केव्हा सुरू होणार, त्याची कार्यपद्धती काय असेल, तसेच परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार, या मुद्द्यांवरही सविस्तर चर्चा झाली. एमआयडीसी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, डीआयसी, नाशिक महापालिका आणि जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त उपस्थितीत तातडीची उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
या बैठकीत शेतकऱ्यांच्या वतीने काही प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत. यामध्ये नापीक शेतीची तातडीने पाहणी करून स्वतंत्र अहवाल प्रसिद्ध करावा, हलगर्जीपणा करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि प्लेटिंग उद्योगांच्या पर्यावरणीय ऑडिटमधील घोटाळ्यांची चौकशी करावी, अशा मागण्यांचा समावेश आहे.
Source: Cosmo News Desk







