नाशिक | गोदावरी नदीचे प्रदूषण रोखून नदीत पर्यावरणपूरक जलप्रवाह कायम राखण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने आणि कालबद्ध पद्धतीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयात गोदावरी नदी प्रदूषण नियंत्रण समितीची आढावा बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
क्रोमियम उत्सर्जक कंपन्यांची तपासणी
नाशिक शहरातील अंबडसह काही भागांतील बोअरवेलच्या पाण्यात क्रोमियम आढळल्याच्या पार्श्वभूमीवर, क्रोमियम उत्सर्जित करणाऱ्या कंपन्यांची महिनाभरात शंभर टक्के तपासणी पूर्ण करून प्रदूषणाची व्याप्ती निश्चित करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. भूजल आणि पृष्ठभागावरील जलस्रोतांमधील प्रदूषणाची व्याप्ती निश्चित करून उपाययोजनांचा आराखडा तयार करण्याच्या सूचना यावेळी दिल्यात आल्या. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गोदावरीत मिसळणाऱ्या सांडपाण्याची नियमित तपासणी करावी आणि क्रोमियमसह अन्य जड धातू आणि प्रदूषकांचीही तपासणी करावी.
आरोग्य शिबिरे आणि इतर उपाययोजना
प्रदूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे का, हे तपासण्यासाठी महानगरपालिकेने संबंधित भागांत आरोग्य शिबिरे आयोजित करावीत. तसेच औद्योगिक सांडपाणी व्यवस्थापनासाठी आवश्यक भूखंड आणि निधी उपलब्ध करण्याबाबत एमआयडीसीने संबंधित यंत्रणांशी समन्वय साधावा. प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादन व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून कापडी पिशव्यांच्या वापराला प्रोत्साहन द्यावे आणि यासाठी महिला बचतगटांना सहभागी करून घ्यावे, असे निर्देशही या बैठकीत देण्यात आले आहेत.
Source: Cosmo News Desk







