पुणे | उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित इंडिया इंटरनॅशनल ओपन तायक्वांदो चॅम्पियनशिप २०२६ च्या उद्घाटन समारंभास हजेरी लावली. तायक्वांदो हा केवळ पदक मिळविण्याचा खेळ नसून शारीरिक ताकदीसोबत मानसिक शिस्त, संयम, एकाग्रता, आत्मविश्वास आणि प्रतिस्पर्ध्याबद्दल आदर शिकवणारा खेळ आहे, असे त्यांनी सांगितले. या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमुळे महाराष्ट्रातील खेळाडूंना जागतिक दर्जाच्या खेळाडूंसोबत घरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. २० ते २६ दरम्यान चालणाऱ्या या सात दिवसांच्या जी-१ दर्जाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत २० देशांतील खेळाडू, प्रशिक्षक आणि प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
खेळाडूंना सुविधा आणि मुलींना प्रोत्साहन
या उद्घाटन समारंभप्रसंगी आशियाई तायक्वांदो संघटनेचे प्रतिनिधी, राज्याचे क्रीडा आयुक्त दीपक सिंघल, भारतीय तायक्वांदोचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. तायक्वांदोमुळे मुलींना स्वसंरक्षणाचे बळ मिळते आणि आत्मविश्वास निर्माण होतो, असे सांगत पालकांनी आपल्या मुलींना खेळण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन सुनेत्रा अजित पवार यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासन खेळाडूंना चांगल्या सुविधा, दर्जेदार प्रशिक्षण आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव मिळावा यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आणि क्रीडा परंपरा
पुणे हे शिक्षणाचे माहेरघर असून क्रीडाक्षेत्रातही शहराचे महत्त्व मोठे आहे, असे सांगत त्यांनी २००८ च्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेपासून बालेवाडी क्रीडा संकुलात झालेल्या विविध स्पर्धांच्या परंपरेचा उल्लेख केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला शौर्य, शिस्त आणि स्वाभिमानाचे संस्कार दिले असून आज क्रीडांगणावर उतरणाऱ्या खेळाडूंमध्ये हेच गुण दिसून येतात, असे त्या म्हणाल्या. जिल्हास्तरीय स्पर्धांमधून ग्रामीण आणि शहरी भागातील मुलांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळत असून, अशा स्पर्धांच्या आयोजनाला राज्य सरकारचे नेहमीच सहकार्य राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Source: Cosmo News Desk











