पुणे | महाराष्ट्राला केवळ देशाचे वाहन उत्पादन केंद्र न ठेवता भविष्यातील मोबिलिटी क्षेत्रातील जागतिक केंद्र बनविण्याचे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे. चाकण येथे मर्सिडीज-बेंझच्या अत्याधुनिक इलेक्ट्रिक जीएलसी वाहनाच्या लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विचार मांडले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मर्सिडीज-बेंझ ग्रुप एजीच्या पर्यवेक्षकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. मार्टिन ब्रुडरम्युलर, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष आणि जागतिक प्रमुख डॉ. ओला कँलेनिअस, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य तथा मुख्य तंत्रज्ञान अधिकारी डॉ. यॉर्ग बुर्जर, आणि पुणे मर्सिडीज-बेंझचे कार्यकारी संचालक संतोष अय्यर उपस्थित होते.
इलेक्ट्रिक वाहन निर्मिती आणि धोरण
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात वाहन उद्योगाचे मोठे जाळे विकसित झाले असून, देशातील एकूण मोटार वाहन उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा २० टक्क्यांहून अधिक आहे. राज्याचे उद्दिष्ट इलेक्ट्रिक वाहने, बॅटरी तंत्रज्ञान, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमोबाईल सॉफ्टवेअर, डिझाइन आणि संशोधन-विकास या क्षेत्रांमध्ये जागतिक नेतृत्व मिळविण्याचे आहे. राज्याच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत २०३० पर्यंत नवीन वाहन नोंदणीमध्ये ३० टक्के इलेक्ट्रिक वाहनांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महामार्गांवरील जलद चार्जिंग सुविधा, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि समृद्धी महामार्गावरील शाश्वत मोबिलिटी कॉरिडॉर तसेच बॅटरी पुनर्वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. मर्सिडीज-बेंझच्या चाकण प्रकल्पातून सुमारे १ हजार २०० जणांना थेट रोजगार मिळाला असून, पुरवठादार आणि सेवा क्षेत्रासह सुमारे १८ हजार व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
जागतिक बाजारपेठेशी जोडणी आणि नवे प्रकल्प
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, प्रस्तावित पुणे-पुरंदर विमानतळ आणि वाढवण बंदर यामुळे महाराष्ट्राची जागतिक बाजारपेठांशी जोडणी अधिक सक्षम होणार आहे. इलेक्ट्रिक जीएलसी वाहनाबाबत अवघ्या ३६ तासांत सुमारे ६५० ग्राहकांनी स्वारस्य दाखविल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यात जागतिक दर्जाच्या इलेक्ट्रिक वाहन उद्योग आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्राला भविष्यातील वाहतूक क्षेत्रात सक्षम करण्याचे स्व. अजित पवार यांचे स्वप्न साकार होत आहे. हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेला पूरक असून, उद्योगांसमोरील अडचणी सोडविण्यासाठी शासन पाठीशी उभे राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.
Source: Cosmo News Desk











