पुणे | भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त ११ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत राज्यभरात ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’ साजरा केला जात आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी समाजापर्यंत विविध शासकीय योजनांचे लाभ पोहोचवले जात असून आरोग्य, शिक्षण, पोषण, स्वच्छता आणि जनजागृतीविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बारामती येथे झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री तथा पुणे व बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आदिवासी बांधवांनी या उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, जल-जंगल-जमिनीच्या संरक्षणासाठी आणि स्वातंत्र्यलढ्यात दिलेले योगदान अतुलनीय असल्याचे त्यांनी नमूद केले. १५ हा नोव्हेंबर हा दिवस देशभरात ‘जनजाती गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो.
पुणे व बीड जिल्ह्यातील विशेष उपक्रम
पुणे जिल्ह्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव यांच्या वतीने सेवा सप्ताहांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना धनादेश वितरण, स्मारक स्वच्छता, दीपोत्सव, रानभाजी महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम, आदिवासी मेळावे, आरोग्य व पोषण शिबिरे तसेच आधारकार्ड आणि कागदपत्रांसाठी सेवा शिबिरांचा समावेश आहे. प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (पीएम-जनमन) योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात १ हजार ९६७ घरकुलांचे उद्दिष्ट आहे, त्यापैकी भूमिहीन ८६३ लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यात आली असून आंबेगाव, भोर, मावळ, मुळशी, खेड, जुन्नर आणि राजगड या सात तालुक्यांतील ६४० लाभार्थ्यांना जागा देण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच जिल्ह्यातील कातकरी समाजातील नागरिकांना १४ हजार ४४१ आधारकार्ड, १३ हजार ४८६ जातीचे दाखले, ११ हजार १७० रेशनकार्ड, ४ हजार २०० आयुष्मान कार्ड, ९७१ जनधन बँक खाते आणि ४८५ जणांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा लाभ मिळाला आहे. बीड जिल्ह्यातही एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत ११ ते १८ नोव्हेंबर दरम्यान सेवा सप्ताह साजरा होत असून वडवणी तालुक्यातील कुप्पा व खलवट निमगाव येथे १५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन एलईडीद्वारे दाखवण्याचे नियोजन आहे. तसेच शिरूर कासार, वडवणी व आष्टी-पाटोदा तालुक्यांत आधारकार्ड शिबिरे आणि आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली आहेत.
आदिवासी विकास विभागाचे शैक्षणिक व कल्याणकारी निर्णय
गेल्या दोन वर्षांत आदिवासी विकास विभागाने शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि क्रीडा क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. पवित्र पोर्टलद्वारे २ हजार ५०० हून अधिक शिक्षकांची पारदर्शक भरती आणि ३ हजारांहून अधिक कंत्राटी शिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सेमी-इंग्रजी व सीबीएसई पॅटर्न, शाळांमध्ये क्रीडा, कला व संगीत शिक्षकांची नियुक्ती आणि स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. आश्रमशाळांमध्ये पहिल्यांदाच परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली असून पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेच्या भत्त्यात ३३ टक्के वाढ करून विस्तार ग्रामीण भागातील अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत करण्यात आला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ‘वीर राघोजी भांगरे’ शिष्यवृत्ती, महिलांसाठी ‘राणी दुर्गावती योजना’ आणि युवकांसाठी ‘विशेष उद्योजकता विकास योजना’ सुरू झाली आहे. कोलाम, कातकरी, माडिया व पारधी जमातींसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर झाले असून शासकीय वसतिगृहांमध्ये मेस सुविधा पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे.
Source: Cosmo News Desk











