पुणे | उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पुणे शहर आणि जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. पुणे येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या या बैठकीत पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपकुमार गिल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुणे शहराची शांतता आणि सुरक्षितता कायम ठेवणे ही पोलिस दलाची मुख्य जबाबदारी असून गुन्हेगारी कृत्ये खपवून घेतली जाणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर आणि कठोर कारवाई
शिवाजीनगर न्यायालय परिसरातील खुनी हल्ल्याची घटना दुर्दैवी असल्याचे नमूद करत उपमुख्यमंत्री पवार यांनी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्याचे आदेश दिले. गुन्हेगारी हालचालींची गुप्त माहिती मिळवणारी यंत्रणा अधिक सक्रिय करावी, अवैध शस्त्रे बाळगणारे, कोयता गँग आणि ड्रग्ज माफियांवर कठोर कारवाई करत वचक निर्माण करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
सार्वजनिक सुरक्षा आणि नागरिकांना आवाहन
शहरातील सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा आणि गस्त वाढवण्यासोबतच संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले. वाहतूक व्यवस्था शिस्तबद्ध करण्यासाठी उपाययोजना कराव्यात असेही त्या म्हणाल्या. घटनेवरून संपूर्ण पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नसले तरी दलाने आपली कार्यक्षमता उंचावण्याची गरज आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
Source: Cosmo News Desk











