पुणे | पुणे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन, चारा उत्पादन, जलसंधारणाची कामे आणि टंचाई निवारणाच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित एका उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत सर्व यंत्रणांनी आपापसात समन्वय साधून नागरिकांना वेळेत मदत उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, महापौर मंजुषा नागापुरे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार विजय शिवतारे, आमदार राहुल कुल, आमदार शंकर मांडेकर, आमदार बाबाजी काळे, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पाणी नियोजन आणि चारा उत्पादन
पिण्यासाठी राखीव ठेवलेल्या पाण्याचा वापर ठरवलेल्या नियोजनानुसारच करावा, तसेच ग्रामीण भागात गरज भासल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा, अशा स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आल्या. रब्बी हंगामातील पिकांसाठी पाण्याचे नियोजन करताना पिण्याच्या पाशाला प्राधान्य दिले जावे. दुष्काळी स्थितीत पशुधनासाठी चारा उपलब्ध व्हावा यासाठी चारा लागवड प्रकल्प राबवले जात असून शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू आहे. उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करून कमी पाणी लागणाऱ्या चारा पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यावर भर दिला जावा.
जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेऊन पाण्याचे स्रोत बळकट करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आवश्यक कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्याचे सांगण्यात आले. नगरपरिषद क्षेत्रांसह ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रभावी आराखडा तयार करावा. प्रशासनाने सतर्क राहून शासकीय योजनांची अंमलबजावणी विनाविलंब करावी आणि नागरिकांना तातडीने मदत पोहोचवावी.
प्रशासन करणार टंचाई निवारण उपाययोजना
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी बैठकीत जिल्ह्यातील दुष्काळ व प्रशासनामार्फत सुरू असलेल्या टंचाई निवारणाच्या उपायांची माहिती सादर केली. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात १ हजार ५४ जलसंधारणाची कामे निश्चित करण्यात आली आहेत. शासनाच्या निर्देशानुसार या कामांचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली. या अंतर्गत शेततळी, बंधाऱ्यांची दुरुस्ती, जलस्रोतांचे बळकटीकरण आणि कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना फळ्या बसविण्याची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
दुष्काळी परिस्थितीमुळे अन्य भागांतून नागरिकांचे स्थलांतर होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे प्रशासनाने विशेष सतर्कता बाळगावी. विविध विभागांनी परस्पर समन्वय राखून नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले आहेत.
Source: Cosmo News Desk









