नाशिक | प्रकाशपर्वाच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर विविधांगी दिव्यांनी सजले आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेसह एम. जी. रोड आणि शालिमार येथे विविध रंगांच्या आकर्षक रोषणाईची लायटिंग ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. व्यापाऱ्यांनीदेखील दुकानांवर आणि रस्त्यावर विलोभनीय लायटिंग केली असून रात्री बाजारपेठेचे रूप अधिकच खुलून दिसत आहे.
प्रमुख बाजारपेठांमधील रोषणाई
मेनरोड, शालिमार, भद्रकाली, रविवार कारंजा, नाशिकरोड, जेलरोड, देवळाली कॅम्प, आडगाव आणि कॉलेज रोड या प्रमुख व्यापारी भागात दिव्यांची आणि इलेक्ट्रॉनिक लाइट्सचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळत आहेत. पारंपरिक पणत्यांसोबतच यंदा बाजारात चायनीज लाइट्ससोबत भारतीय लायटिंगलादेखील मोठी मागणी आहे.
यात एलईडी माळ, आरजीबी पिक्सल लाइट्स आणि वेगवेगळ्या आकारांतील लायटिंग मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाली आहे. लक्ष वेधून घेणारी लायटिंग खरेदीसाठी ग्राहक सायंकाळच्या वेळी सहकुटुंब बाहेर पडत आहेत. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक लाइट्सच्या दुकानांवर ग्राहकांची गर्दी दिसत असून व्यापाऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.
नवीन प्रकार आणि भारतीय लायटिंगची मागणी
यंदाच्या दिवाळीसाठी वॉटरप्रूफ एलईडी माळ, रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या डिस्को लाइट्स आणि घराच्या भिंतीवर लक्ष्मीची पावले उमटवणारे लेजर लाइट्स ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. घराबाहेरचे रंगीबेरंगी फिरते लाइट्सदेखील बाजारात विविध डिझाईन्समध्ये उपलब्ध आहेत.
इलेक्ट्रिक वस्तू विक्रेते अमोल वरखेडे यांच्या मते, बाजारात चिनी आकाशकंदील उपलब्ध असले तरी घरांची सजावट करण्यासाठी भारतीय लायटिंगला ग्राहकांकडून पसंती आहे. ‘शुभ दीपावली’ नावाच्या आकर्षक लायटिंगलाही मागणी असून, भारतीय संस्कृती आणि सणांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या लायटिंगमुळे घराच्या सजावटीला वेगळेपण प्राप्त होत आहे.
Source: Cosmo News Desk





