नाशिक | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. ३१) होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्याकडे प्रशासनाने त्र्यंबकेश्वर येथील कामकाजाची जबाबदारी सोपवली आहे. या घोषणेनंतर पवार यांनी मंगळवारी (दि. २७) तातडीने त्र्यंबकेश्वर येथे भेट देत विविध विकासकामांची पाहणी केली.
कुशावर्त तीर्थ व गंगाघाट परिसराची पाहणी
त्र्यंबकेश्वर येथे पोहोचल्यानंतर ओमकार पवार यांनी कुशावर्त तीर्थ परिसराची पाहणी केली आणि तेथील कामांचा सविस्तर आढावा घेतला. तसेच त्यांनी गंगाघाट परिसरात सुरू असलेल्या कामांचीही पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान कामांची सद्यःस्थिती, उर्वरित कामे आणि ती पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली. तसेच प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.
अधिकारी व यंत्रणांमध्ये समन्वय राखण्याचे निर्देश
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आणि परिसरातील विकासकामे वेळेत पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर संबंधित सर्व यंत्रणांमध्ये योग्य समन्वय राखण्याच्या दृष्टीने पवार यांनी प्रत्यक्ष स्थळभेट देऊन कामांचा आढावा घेतला. या पाहणी दौऱ्यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी पवन दता, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील, तहसीलदार गणेश जाधव व गटविकास अधिकारी रविकांत सानप उपस्थित होते.
Source: Cosmo News Desk







