मुंबई | प्रतिकूल परिस्थिती ही स्वप्नांच्या आड येणारी भिंत नसून स्वतःमधील सामर्थ्य ओळखण्याची संधी असते, असे प्रतिपादन भारताच्या पहिल्या महिला पॅरालिम्पिक पदकविजेत्या पद्मश्री डॉ. दीपा मलिक यांनी केले. मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात २४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान आयोजित ‘मुंबई पुस्तक महोत्सव २०२६’मध्ये ‘उंच भरारी घेण्याचे धैर्य’ या विषयावर विशेष संवाद सत्र पार पडले. मोहम्मद मुर्तझा अली यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या बालपणापासूनचा संघर्ष, क्रीडा क्षेत्रातील वाटचाल आणि आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर नव्याने स्वतःला सिद्ध करण्याचा प्रवास उलगडला.
प्रयत्नांची ज्योत आणि संघर्षमय प्रवास
लहानपणीच अनेक शारीरिक आव्हानांना सामोरे जावे लागल्याचे डॉ. दीपा मलिक यांनी सांगितले. उपचार, शस्त्रक्रिया आणि पुनर्वसनाच्या प्रदीर्घ प्रक्रियेतून जात असताना आई-वडिलांनी दिलेला विश्वास व सकारात्मक दृष्टिकोन यामुळे जिद्द निर्माण झाली. आयुष्यातील एका अत्यंत कठीण टप्प्यावर त्यांनी मुलींचे संगोपन करणे आणि स्वतःचे आयुष्य अर्थपूर्ण बनविणे हे ध्येय निश्चित केले. विशेष म्हणजे वयाच्या चाळिशीनंतर त्यांनी मैदानी क्रीडा क्षेत्रात प्रवेश केला. नव्याने कौशल्ये आत्मसात करून त्यांनी २०१६ मधील रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत गोळाफेक प्रकारात रौप्यपदक पटकावले. सातत्यपूर्ण सराव आणि कठोर परिश्रमाच्या बळावर त्यांनी हा इतिहास रचला.
खेळ आणि प्रशासनातील अनुभव
कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्टता मिळविण्यासाठी सातत्य, चिकाटी आणि कठोर परिश्रम आवश्यक असतात, असे त्यांनी नमूद केले. खेळाडू म्हणून कारकीर्द घडविताना मिळविलेल्या अनुभवाचा उपयोग क्रीडा प्रशासनात व्हावा म्हणून त्यांनी क्रीडा धोरणे, निधी उभारणी आणि प्रशिक्षण पद्धती यांचा अभ्यास केला. ज्ञानाची भूक कायम ठेवली तर नवे क्षितिज गाठता येते, असे त्यांनी सांगितले. दिव्यांग खेळाडूंना संधी आणि प्रोत्साहन मिळाल्यास ते आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा गौरव करू शकतात, असे सांगत त्यांनी उपस्थितांना आव्हानांकडे संधी म्हणून पाहण्याचे आवाहन केले.
Source: Cosmo News Desk











