Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • तळेगावच्या नॅशनल हेवी इंजिनिअरिंग संस्थेचे पुनरुज्जीवन आणि भारत टॅक्सीचा प्रारंभ
Maharashtra

तळेगावच्या नॅशनल हेवी इंजिनिअरिंग संस्थेचे पुनरुज्जीवन आणि भारत टॅक्सीचा प्रारंभ

तळेगाव येथील नॅशनल हेवी इंजिनिअरिंग संस्था आणि भारत टॅक्सी प्रारंभ सोहळा

पुणे | महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचा समृद्ध वारसा देशभर पोहोचविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. याच पार्श्वभूमीवर, देशाच्या पश्चिम विभागातील सहकारी संस्थांना मार्गदर्शन व सहकार्य करण्यासाठी पुण्यात सहकार मंत्रालयाचे पश्चिम विभागीय कार्यालय सुरू करण्यात आले आहे. तसेच, तळेगाव येथील बंद पडलेली नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेड ही बहुराज्य सहकारी संस्था दीड हजार कोटी रुपयांच्या वित्तीय सहाय्याने पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सहकारी तत्त्वावर आधारित आणि कमिशनविरहित ‘भारत टॅक्सी’ सेवेचा प्रारंभ करण्यात आला असून याद्वारे टॅक्सीचालकांना स्वतःच्या सेवेचे मालक होण्याची संधी मिळणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांनी केले.

तळेगाव येथे नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेड या बहुराज्य सहकारी संस्थेच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाचे भूमिपूजन, पुण्यात सहकारी संस्थांचे केंद्रीय निबंधक (सीआरसीएस) यांच्या पश्चिम विभागीय कार्यालयाचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन आणि पुण्यासाठी ‘भारत टॅक्सी’ सेवेच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, माजी आमदार संजय (बाळा) भेगडे तसेच केंद्रीय सहकार सचिव आशिषकुमार भुटानी उपस्थित होते.

तळेगाव प्रकल्पाचे महत्त्व आणि प्रशासकीय सेवा

तळेगाव येथील बंद पडलेली नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेड ही महत्त्वाची बहुराज्य सहकारी संस्था पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी दीड हजार कोटी रुपयांचे वित्तीय सहाय्य दिले जाईल. या संस्थेमध्ये सहकारी साखर कारखाने, इथेनॉल प्रकल्प आणि दूध डेअरी यांना आवश्यक असणारी यंत्रसामग्री तयार केली जाणार आहे. त्यामुळे सहकारी संस्थांना लागणारी यंत्रसामग्री देशातच उपलब्ध होण्यास मदत होईल आणि सहकार क्षेत्राची औद्योगिक क्षमता वाढण्याबरोबरच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. तसेच, पुण्यात सुरू करण्यात आलेल्या केंद्रीय निबंधकांच्या पश्चिम विभागीय कार्यालयामुळे बहुराज्य सहकारी संस्थांना त्यांच्या कार्यक्षेत्रातच प्रशासकीय व नियामक सेवा उपलब्ध होण्यासह नोंदणी व विविध प्रशासकीय कामकाजात सुलभता येणार आहे.

भारत टॅक्सी सेवा आणि मान्यवरांचे मनोगत

‘भारत टॅक्सी’ सेवेच्या माध्यमातून सहकारी तत्त्वावर परिवहन सेवा विकसित करण्याच्यादृष्टीने पाऊल उचलण्यात आले असून, चालकांना कमिशन न देता त्यांच्या सेवेवर मालकी हक्क मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, केंद्र सरकारने सहकार क्षेत्राच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांवरील सुमारे दहा हजार कोटी रुपयांचा कर माफ करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले की, या प्रकल्पामुळे शेकडो लोकांना रोजगाराच्या संधी मिळतील आणि सहकार क्षेत्राला औद्योगिक बळ मिळेल. दरम्यान, नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (एनएचईसी) आणि आयडीएमसी लिमिटेड यांच्यात सामंजस्यासाठी आशयपत्राची देवाणघेवाण करण्यात आली. तसेच ‘भारत टॅक्सी’च्या वतीने चार सारथींना प्रतिनिधिक स्वरूपात समभाग प्रमाणपत्रांचे वितरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले.

Source: Cosmo News Desk

Related Posts