मुंबई | राज्यातील सर्व शाळांमध्ये ई-कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती, संकलन आणि योग्य विल्हेवाटीसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत 28 ऑक्टोबर रोजी विशेष अभियान राबविण्यात येत आहे. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागांतर्गत ‘इको क्लब्स फॉर मिशन लाइफ’ उपक्रमाच्या माध्यमातून हे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सर्व शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समित्या आणि नागरिकांना या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे.
ई-कचऱ्याचे धोके आणि योग्य विल्हेवाट
मोबाईल फोन, संगणक, चार्जर, बॅटरी आणि अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांची अयोग्य विल्हेवाट पर्यावरण व मानवी आरोग्यास हानीकारक ठरू शकते. त्यामुळे ई-कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, सुरक्षित संकलन, पुनर्वापर आणि अधिकृत पुनर्प्रक्रिया करण्यावर अभियानात भर दिला जाणार आहे. संकलित ई-कचऱ्याची अधिकृत व नोंदणीकृत पुनर्प्रक्रिया संस्थांमार्फत योग्य विल्हेवाट लावण्यासाठी कार्यवाही केली जाईल.
शाळांमधील उपक्रम आणि विद्यार्थ्यांचा सहभाग
या अभियाнаंतर्गत शाळांमध्ये जनजागृती कार्यक्रम, प्रश्नमंजुषा, चर्चासत्रे आणि प्रबोधनात्मक उपक्रम आयोजित केले जातील. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या सहभागातून घरातील व शाळेतील वापरात नसलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे ओळखून त्यांचे सुरक्षित संकलन केले जाईल. अभियानात विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा अनावश्यक वापर कमी करण्याबरोबरच दुरुस्ती, पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रियेचे महत्त्व समजावून सांगण्यात येणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने ‘मी ई-कचरा व्यवस्थापनाचा जबाबदार योद्धा आहे’ हा संकल्प करून कुटुंबात व परिसरात ई-कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करावी, असे आवाहन मंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.
Source: Cosmo News Desk









