Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • इंडिया ज्वेलरी पार्कमुळे महाराष्ट्र जागतिक दागिने निर्यातीचे केंद्र बनेल
Maharashtra

इंडिया ज्वेलरी पार्कमुळे महाराष्ट्र जागतिक दागिने निर्यातीचे केंद्र बनेल

नवी मुंबईतील महापे येथे इंडिया ज्वेलरी पार्क प्रकल्पाचा शुभारंभ सोहळा

ठाणे | नवी मुंबईतील महापे येथील टीटीसी औद्योगिक क्षेत्रात ‘इंडिया ज्वेलरी पार्क, मुंबई’ या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. मुंबई आणि महाराष्ट्राची व्यावसायिक क्षमता, कुशल मनुष्यबळ आणि सुरक्षित औद्योगिक वातावरण यांच्या जोरावर महाराष्ट्राला जागतिक स्तरावरील दागिने उत्पादन व निर्यातीचे प्रमुख केंद्र बनविण्याची क्षमता आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री गणेश नाईक, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बळगन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र कुशवाह आणि रत्न व आभूषण निर्यात प्रोत्साहन परिषदेचे अध्यक्ष किरीट भन्साळी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. हा प्रकल्प बदलत्या जागतिक व्यापाराशी जुळवून घेण्यासाठी आधुनिक व्यासपीठ उपलब्ध करून देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये आणि गुंतवणूक

महापे येथील २२ एकर क्षेत्रावर हे अत्याधुनिक दागिने उत्पादन केंद्र विकसित केले जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपात एक लाख रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत. या पार्कमध्ये दोन हजारांहून अधिक उत्पादन युनिट्स सामावून घेण्याची क्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. देशाच्या एकूण रत्न व आभूषण निर्यातीपैकी ५० टक्क्यांहून अधिक निर्यात महाराष्ट्रातून होते. राज्य शासनाच्या जेम्स अँड ज्वेलरी धोरणाद्वारे एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करणे, पाच लाख रोजगार निर्माण करणे आणि निर्यात दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रकल्पासाठी आवश्यक वीज, पाणी, रस्ते आणि परवानग्या वेळेत मिळवून देण्यासाठी शासनाकडून पूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

आर्थिक विकासाला मिळणार बळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत विकसित भारत घडविण्याचा संकल्प केला असून, त्यामध्ये उत्पादन आणि निर्यातीची भूमिका महत्त्वाची आहे. भारत पाच ट्रिलियन अमेरिकी डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करत असताना महाराष्ट्र एक ट्रिलियन अमेरिकी डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्नशील आहे. इंडिया ज्वेलरी पार्कसारखे प्रकल्प या आर्थिक वाटचालीस बळ देणार आहेत. नवी मुंबईची ओळख आता डेटा सेंटर हबसोबतच जागतिक स्तरावरील दागिने उद्योगाचे महत्त्वाचे केंद्र म्हणूनही वाढणार आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Source: Cosmo News Desk

Related Posts