मुंबई | राज्यातील कृषी व अन्नप्रक्रिया आणि दुग्धजन्य पदार्थांवर प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे वरुण बेव्हरेजेस लिमिटेड कंपनीतर्फे २,१०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. यासंदर्भातील एक अत्याधुनिक एकात्मिक उत्पादन प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी सामंजस्य करार संपन्न झाला. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि वरुण बेव्हरेजेस लिमिटेड यांच्यामध्ये हा करार करण्यात आला आहे.
आर्वी येथे अत्याधुनिक प्रकल्प आणि रोजगार निर्मिती
वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील एमआयडीसीच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये हा प्रकल्प उभारला जाईल. या प्रकल्पामुळे तब्बल ५५० जणांना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत दैनंदिन वापरातील ग्राहकोपयोगी वस्तू (एफएमसीजी) आणि पेयपदार्थांच्या निर्मितीसाठी अत्याधुनिक उत्पादन युनिट उभारण्यात येणार आहे. प्राप्त माहितीनुसार, या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम एप्रिल २०२७ पासून सुरू करण्याचे नियोजन ठरवण्यात आले आहे.
ग्रामीण अर्थव्यवस्थेला व विदर्भाच्या विकासाला चालना
फळांचे ज्यूस, अन्नप्रक्रिया तसेच कृषीमालावर आधारित उद्योगांच्या विकासाला ही गुंतवणूक अत्यंत पूरक ठरणार आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक शेतकरी, कृषीपूरक व्यवसाय आणि पर्यायाने विदर्भातील औद्योगिक व ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. या महत्त्वपूर्ण करारप्रसंगी आमदार सुमित वानखेडे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र कुशवाह, उद्योग आयुक्त कादंबरी बलकवडे, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्या आयुक्त व व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार, गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे तसेच वरुण बेव्हरेजेस लिमिटेडचे मुख्य परिचालन अधिकारी तथा तांत्रिक विभागाचे समूहप्रमुख राजिंदर जीत सिंग बग्गा आदी मान्यवर उपस्थित होते.
Source: Cosmo News Desk











