Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त पवन शिंदे कुटुंबीयांकडून अवयवदान व साइबर जनजागृती
Nashik

वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त पवन शिंदे कुटुंबीयांकडून अवयवदान व साइबर जनजागृती

नाशिक | वर्षश्रद्धाच्या कार्यक्रमाला सामाजिक दायित्वाची जोड देत समाजापुढे नवा आदर्श निर्माण करण्याचा उपक्रम सनदी अधिकारी पवन शिंदे आणि मोटर वाहन व्यावसायिक जीवन शिंदे यांच्या कुटुंबांनी हाती घेतला आहे. त्यांचे वडील कै. वसंतराव देवराम शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरणनिमित्त आयोजित वर्षश्रद्धा कार्यक्रमात साइबरविषयक आणि अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित करणारे विशेष प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दुःखाच्या प्रसंगाला सामाजिक विचारांची जोड देणारा हा उपक्रम नाशिकमध्ये लक्षवेधी ठरत आहे. शुक्रवारी (दि. ३०) हा कार्यक्रम होणार आहे. दिवंगत वडिलांच्या स्मृती जपताना समाजातील ज्वलंत प्रश्नाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

साइबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन

सनदी अधिकारी पवन शिंदे हे २००३ च्या यूपीएससी बॅचचे अधिकारी असून, सद्यस्थितीत ते निवडणूक आयोगात कार्यरत आहेत. वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणनिमित्त केवळ पारंपरिक विधींवर भर न देता सामाजिक प्रश्नांवर जनजगृती घडवून आणण्याचा शिंदे कुटुंबाचा हा प्रयत्न स्मृतींना समाजोपयोगी विचारांची जोड देणारा ठरत आहे. ‘सावध राहा, सुरक्षित राहा’ हा संदेश या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी असणार आहे. सोशल मीडिया आणि यूपीआयचा वापर वाढला असताना साइबर गुन्ह्यांचे आव्हान गंभीर बनले आहे. ही बाब लक्षात घेऊन साइबर संस्कार संस्थेच्या वतीने साइबर जनजागृतीपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या सत्रात डी. एस. राणा (आयपीएस ऑफिसर) आणि तन्मय दीक्षित मार्गदर्शन करणार आहेत. ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, सेक्सटॉर्शन, बनावट एपीके फाइल्स, यूपीआय व ओटीपीच्या माध्यमातून होणारी फसवणूक आणि डिजिटल सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर यावेळी प्रकाश टाकण्यात येणार आहे.

अवयवदानाचे महत्त्व आणि जनजागृती

या कार्यक्रमाचे दुसरे महत्त्वाचे आकर्षण म्हणजे अवयवदान जनजागृती आहे. ‘अवयवदान करा, जीवनदान द्या’ असा संदेश यानिमित्ताने दिला जाणार आहे. टीम सह्याद्री हॉस्पिटल, नाशिक यांच्या वतीने अवयवदानाचे महत्त्व, त्यासंबंधीची प्रक्रिया, समाजातील गैरसमज आणि नागरिकांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. एका व्यक्तीच्या निर्णयामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते, हा विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे. पवन शिंदे यांनी स्पष्ट केले आहे की, डिजिटल युगात नागरिकांसमोर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष आव्हाने उभी असून साइबर सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. तसेच आपल्या मृत्यूनंतरही शरीराचा उपयोग इतरांना व्हावा, यासाठी अवयवदान चळवळ पुढे नेण्याची आवश्यकता आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts