नाशिक | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणाऱ्या ध्वजारोहण समारंभाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर नगरीला कडक सुरक्षा व्यवस्थेत गुरुवारी (दि. २९) सकाळपासून पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. राष्ट्रपतींच्या त्र्यंबक भेटीमुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाकडून अत्यंत कठोर पावले उचलण्यात आली असून संपूर्ण शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पोलिसांचा पहारा आणि सुरक्षा आढावा
शहरातील मुख्य मार्गासह सर्वत्र पोलिसांचा खडा पहारा उभा करण्यात आला आहे. यादरम्यान दुपारी ३ च्या सुमारास पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुशावर्त तीर्थास प्रत्यक्ष भेट दिली. याशिवाय ध्वजारोहण स्थळाच्या संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कसून आढावा घेतला.
दुकाने बंद व आठवडे बाजार रद्द
राष्ट्रपती आणि इतर मान्यवर नेत्यांचा दौरा असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव प्रमुख मार्गावरील दुकाने दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच, या काळात कोणताही आठवडे बाजार भरणार नाही, याबाबतची अधिकृत अधिसूचना देखील काढण्यात आली आहे.
Source: Cosmo News Desk







