Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • सिंहस्थ महाआरतीत महिला पुरोहित करणार गोदापूजन, राष्ट्रपती राहणार उपस्थित
Nashik

सिंहस्थ महाआरतीत महिला पुरोहित करणार गोदापूजन, राष्ट्रपती राहणार उपस्थित

नाशिक | सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने शनिवारी (दि. ३१) रामतीर्थ येथे गोदापूजन आणि जनजातीय सिंहस्थ महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सदस्य, तेरा आखाड्यांतील संत-महंत, जगद्गुरू, शंकराचार्य आणि विविध आध्यात्मिक परंपरांतील मान्यवर सहभागी होणार आहेत. या सोहळ्याची माहिती रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महिला पुरोहित करणार गोदावरी मातेचे पूजन

या सोहळ्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे विविध समाजघटकातील महिला पुरोहित म्हणून गोदावरी मातेच्या पूजनविधीचे नेतृत्व करणार आहेत. सोहळ्यात धार्मिक विधींचे निवेदन, पूजनविधीचे मार्गदर्शन आणि महाआरतीचे संचालन अशा महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या महिला पार पाडणार आहेत. धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात महिलांना सन्मानाचे स्थान देण्यासोबतच त्यांच्या ज्ञान, साधना आणि नेतृत्वक्षमतेचा गौरव करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. स्त्रीशक्तीचा सन्मान, समानतेची भावना आणि सर्व समाजघटकांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा संदेश या माध्यमातून दिला जाणार आहे. श्रद्धा आणि सेवाभावाच्या बळावर महिला धार्मिक परंपरांचे जतन व संवर्धन करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतात, ही भावना या आयोजनातून अधोरेखित होणार आहे.

जनजातीय सहभाग आणि जलसंवर्धनाचा संकल्प

जनजातीय बांधवांचा सन्मानपूर्ण सहभाग हा या महाआरतीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. जनजातीय समाजाचे निसर्ग, जलस्रोत आणि पर्यावरणाशी असलेले अतूट नाते लक्षात घेऊन त्यांच्या सांस्कृतिक परंपरांचा गौरव करण्यात येणार आहे. विविध समाजघटक, महिला, जनजातीय बांधव, संत-महंत आणि आध्यात्मिक परंपरांतील मान्यवररांना एकाच व्यासपीठावर आणत सामाजिक समरसता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्न या सोहळ्यातून केला जाणार आहे. गोदावरी मातेचे पूजन करताना तिचे पावित्र्य जपणे, नदी प्रदूषणमुक्त ठेवणे आणि जलस्रोतांचे संवर्धन करण्याचा संकल्प केला जाणार असून याद्वारे भाविकांमध्ये पर्यावरण व जलसंवर्धनाबाबत जनजागृती केली जाणार आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts