नाशिक | नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा भाग म्हणून गुरुवारी (दि. २९) दुपारी रामकुंड परिसराची संयुक्त पाहणी करण्यात आली. सिंहस्थाच्या विकासकामांची गती अत्यंत संथ असल्यामुळे आणि साधुग्राम उभारणीबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतेही ठोस नियोजन दिसून येत नसल्यामुळे साधू-महंतांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सुरक्षा आणि पायाभूत सुविधांची पाहणी
राष्ट्रपतींचा आगामी दौरा, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची उपस्थिती तसेच भाविकांची संभाव्य प्रचंड गर्दी या सर्व गोष्टी लक्षात घेऊन रामकुंड परिसरातील सुरक्षा व्यवस्था, नागरिकांच्या ये-जा करण्याचे मार्ग, स्वच्छता आणि इतर आवश्यक पायाभूत सुविधांची यावेळी पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान साधू-महंतांनी प्रशासनाला विविध महत्त्वाच्या सूचना केल्या.
आखाडा परिषदेच्या पदाधिकारांची उपस्थिती
या पाहणी दौऱ्यात अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्त महंत संजयदास महाराज, निर्वाणी अणी आखाड्याचे श्रीमहंत मुरलीदास महाराज, महासचिव महंत सत्यदेवदास महाराज, महंत नंदरामदास महाराज, महंत डॉ. महेशदास महाराज, महंत राजेशदास महाराज, महंत भक्तिचरणदास महाराज, महंत हेमंतदास महाराज आणि महंत माधवदास महाराज यांच्यासह विविध आखाड्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान, पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही रामकुंडावर साधू-महंतांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. याशिवाय, तयारीच्या पाहणीदरम्यान पुरोहित संघ प्रतिनिधी व रामतीर्थ समिती पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चमकम उडाली होती.
Source: Cosmo News Desk







