नाशिक | नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वतयारी आढावा बैठक पार पडली. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी या बैठकीत सर्व संबंधित विभागांना समन्वयाने सूक्ष्म व परिपूर्ण नियोजन करण्याचे निर्देश दिले. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेबाबत काटेकोर उपाययोजना करतानाच भाविक व सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची पूर्ण दक्षता घेण्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीस महापौर हिमगौरी आडके आहेर, आमदार गोकुळ गीते, आमदार राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, आमदार हिरामण खोसकर, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह विविध अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांची गैरसोय टाळण्याचे निर्देश
ध्वजारोहण सोहळ्यासाठी येणारे भाविक आणि नागरिकांच्या सोयी-सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले. वाहनतळापासून कार्यक्रमस्थळापर्यंत पोहोचण्यासाठीचे मार्ग सुकर असावेत. भाविकांना कमीत कमी अंतर चालावे लागेल अशा प्रकारे वाहनतळ, वाहतूक व्यवस्था आणि होल्डिंग एरियाचे नियोजन करावे. गर्दीचे व्यवस्थापन आणि आपत्कालीन यंत्रणा प्रभावी असावी. या सर्व नियोजनामुळे स्थानिक नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यास सांगण्यात आले. ग्राम प्रदक्षिणा, ध्वजारोहण समारंभ, सायंकाळची आरती, शंखनाद आणि अन्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन वेळेत पूर्ण करावे. तसेच साधू, संत, महंत, आखाडे प्रमुख आणि मान्यवरांना निमंत्रणे पाठविण्याची कार्यवाही ताտडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.
विविध उपक्रम आणि जागतिक विक्रम तयारीचा आढावा
बैठकीत कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी आतापर्यंतच्या पूर्वतयारीची माहिती सादर केली. ग्रामपरिक्रमा, गोदावरी आरती, मान्यवरांचे दौरे आणि त्र्यंबकेश्वर येथे शंकराचार्यांच्या दर्शनाबाबत त्यांनी माहिती दिली. कुंभमेळ्याच्या व्यापक प्रसिद्धीसाठी संकेतस्थळाचे अनावरण, कॉफी टेबल बुक, कुंभगीत आणि टपाल तिकीट यांसारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक आणि पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी सुरक्षा व्यवस्था व वाहतूक नियोजनाची माहिती दिली. शंखनादाच्या माध्यमातून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविण्याच्या प्रस्तावित उपक्रमाच्या तयारीचाही आढावा घेण्यात आला. तसेच ३० ऑक्टोबर रोजी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे शोभायात्रा आणि ग्रामपरिक्रमा आयोजित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. या सोहळ्यास नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
Source: Cosmo News Desk






