Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • शालार्थ घोटाळा प्रकरण: शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात, शिक्षण विभागात खळबळ
Nashik

शालार्थ घोटाळा प्रकरण: शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात, शिक्षण विभागात खळबळ

नाशिक | राज्यभरात खळबळ उडवणाऱ्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याचे पडसाद आता शिक्षण क्षेत्रात उमटू लागले आहेत. या प्रकरणातील संशयित शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या असून, त्यांचे वेतन रोखणे, वैयक्तिक मान्यता रद्द करणे आणि नियमबाह्य नियुक्त्यांची चौकशी करण्यासाठी शिक्षण विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. आतापर्यंत पोलिसांकडून सुरू असलेल्या तपासाला आता शिक्षण विभागाच्या प्रशासकीय कारवाईची जोड मिळत असल्याने बोगस नियुक्त्यांद्वारे शासकीय वेतनाचा लाभघेणाऱ्यांवरील कारवाईचा फास अधिक घट्ट होण्याची शक्यता आहे. नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके आणि डॉ. सचिन बारी यांच्या एसआयटीकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. विशेष तपास पथकाकडून विविध कागदपत्रांची छाननी आणि संशयित नियुक्त्यांची पडताळणी केली जात आहे.

नाशिक आणि जळगाव विभागात कारवाईचा बडगा

नाशिक विभागात पहिल्या टप्प्यात १५० शिक्षकांची मान्यता रद्द करून त्यांचे वेतन थांबविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक विभागातील एकूण ८९३ संशयास्पद प्रकरणांची छाननी सुरू असून, त्यातून आणखी अनियमितता समोर येण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यात एसआयटीच्या छाननीनंतर १३२ जणांच्या मान्यता रद्द करण्याचे आणि वेतन थांबविण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यातील ६३२ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून त्यांच्या नियुक्त्या अवैध ठरवून वेतन रोखण्याची कारवाई करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यापूर्वी अंतरिम दिलासा दिला असला तरी, राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करण्यात आल्याची माहिती आहे.

ऑनलाइन पडताळणी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई

राज्यभरातील सुमारे चार लाख शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी सुरू आहे. या प्रक्रियेत सुमारे १६ ते १७ हजार कर्मचाऱ्यांच्या शालार्थ माहितीमध्ये किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्याचे समोर आले आहे. संबंधितांना नोटिसा बजावून मूळ कागदपत्रे सादर करण्यास सांगितले जात आहे. एसआयटीच्या चौकशीदरम्यान अधिकाऱ्यांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आणि कथित ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर बीड व लातूर जिल्ह्यांतील प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या निलंबनाची कारवाई झाल्याची माहिती आहे. चौकशीत नियमबाह्य नियुक्त्या किंवा बनावट कागदपत्रे सिद्ध झाल्यास संबंधित शिक्षकांसह संस्थाचालक आणि जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई होऊ शकते.

Source: Cosmo News Desk

Related Posts