नाशिक | गोदावरीच्या पवित्र तीरावर कोजागरी पौर्णिमेच्या पावन पर्वावर एका ऐतिहासिक सोहळ्यात ५१७ व्यक्तींनी सामूहिक शंखनाद करत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. अमेरिकेचा एकाच वेळी ३०३ जणांनी शंखनाद करण्याचा पूर्वीचा विक्रम मागे टाकत नाशिकने ही कामगिरी केली आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रतिनिधी ऋषिकेश नाग यांनी हा नवा जागतिक विक्रम झाल्याची अधिकृत घोषणा करताच संपूर्ण परिसर ‘भारत माता की जय’च्या जयघोषाने दुमदुमून गेला. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण आणि अनंत विजय शंखनाद पथक यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंत महाराज पटांगण येथे हा उपक्रम पार पडला. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने साधू-महंत, शंखनाद वादक आणि नागरिक उपस्थित होते.
शंखनादाच्या यशाने देशाच्या लौकिकात भर
पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सर्व सहभागींचे मनःपूर्वक अभिनंदन केले. हा उपक्रम केवळ नाशिक किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून देशाच्या लौकिकात भर घालणारा आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. शंख वाजविणे ही केवळ धार्मिक कृती नसून त्यासाठी श्वसनावर नियंत्रण, नियमित सराव, प्राणायाम आणि शारीरिक क्षमता आवश्यक असते. शेकडो नागरिकांनी एकाच वेळी शंखनाद करण्यासाठी दाखविलेली शिस्त आणि उत्साह कौतुकास्पद ठरला. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या निर्धारित निकषांनुसार आणि नियमांची पडताळणी केल्यानंतर हा विक्रम अधिकृत ठरवण्यात आला. या सोहळ्यामुळे आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या मंगल पर्वाची आध्यात्मिक नांदी झाली आहे.
सिंहस्थ कुंभमेळा आणि आगामी नियोजन
सिंहस्थ कुंभमेळा हा प्रत्येक नाशिककराचा सोहळा असून प्रत्येकाने यात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे, असे आवाहन पालकमंत्री महाजन यांनी केले. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाचा सन्मान आपल्या घरच्या पाहुण्यासारखा केला पाहिजे. प्रशासनाबरोबरच नागरिक, व्यापारी, स्वयंसेवक यांनी परस्पर समन्वयाने काम करून नाशिकची स्वच्छता, सुंदरता आणि आदरातिथ्य जपले पाहिजे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीचा महत्त्वाचा टप्पा म्हणून येत्या ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी नाशिक येथील रामकुंडावर आणि त्र्यंबकेश्वर येथे ध्वजारोहण सोहळा होणार आहे.
Source: Cosmo News Desk







