नाशिक | केंद्राच्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत नाशिक महानगरपालिकेच्या नागरी आरोग्य संस्थांमधील सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रशासनाला कडक निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांना सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्यसेवा तातडीने उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला असून, आरोग्य संस्थांमध्ये एकूण १३ प्रकारच्या सेवा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या मोहिमेमुळे शहरातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होणार आहे.
आरोग्य संस्था आणि उपलब्ध सेवा
केंद्राने आरोग्य आणि निरामयता केंद्रांच्या माध्यमातून सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा देण्यासाठी कार्यात्मक मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. त्यानुसार नागरी आयुष्मान आरोग्य मंदिरे, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, सामुदायिक आरोग्य केंद्र तसेच ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ या संस्थांमधून आरोग्यसेवा उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत.
या संस्थांमध्ये गरोदरपण व बाळंतपणातील काळजी, नवजात शिशु आरोग्य, किशोरवयीन आरोग्य, कुटुंब नियोजन, संसर्गजन्य आजार व्यवस्थापन, किरकोळ आजार, असंसर्गजन्य रोग तपासणी, नेत्र व कान-नाक-घसा विकार आणि मौखिक आरोग्य यासारख्या सेवा मिळणार आहेत. तसेच वृद्ध व उपशामक सेवा, आपत्कालीन उपचार, मानसिक आरोग्य तपासणी, योग आणि वेलनेस सेवांचा देखील यात समावेश करण्यात आला आहे.
औषधोपचार, सहभाग आणि रुग्णसंख्येचे उद्दिष्ट
आरोग्यसेवा प्रभावी करण्यासाठी औषधांची उपलब्धता, प्रयोगशाला तपासणी, प्रशिक्षित मनुष्यबळ, आर्थिक तरतूद आणि सक्षम पर्यवेक्षण यांना देखील विशेष महत्त्व देण्यात आले आहे. प्रशासनाला प्रभाग आणि शहरस्तरीय आरोग्य कृती आराखडे तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महिला आरोग्य समिती, जन आरोग्य समिती, रुग्ण कल्याण समिती, शालेय आरोग्यदूूत, बचतगट आणि रहिवासी संघाच्या माध्यमातून नागरिकांचा सहभाग वाढविण्यात येणार आहे.
सेवांचे उद्दिष्ट निश्चित करताना नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व सामुदायिक आरोग्य केंद्रात दररोज १५० रुग्णांना सेवा देण्याचे लक्ष्य आहे. तसेच आयुष्मान आरोग्य मंदिरे आणि ‘आपला दवाखाना’ येथे दररोज १०० बाह्यरुग्णांना सेवा देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यामुळे मनपाच्या आरोग्य यंत्रणेला सेवा गुणवत्ता, उपलब्ध सुविधा आणि रुग्णसंख्या या निकषांवर अधिक सक्षमपणे काम करावे लागणार आहे.
Source: Cosmo News Desk





