मुंबई | आरे कॉलनी येथे उभारण्यात येत असलेल्या ‘ओम द ग्लोबल आर्ट सेंटर’ आणि ‘आरे म्युझियम’ या प्रकल्पांना शासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार आहे. कला, कलाकार आणि कलाशिक्षणाला प्रोत्साहन देऊन सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले. आरे कॉलनीतील निसर्गरम्य परिसरात आयोजित ‘शिल्परंग-१२’ या राष्ट्रीय कला परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमास सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, खासदार रवींद्र वायकर, एबीपी न्यूज व एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर, वित्त विभागाचे सहसचिव संजय इंगळे, आरे मिल्क कॉलनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत शिपूरकर, तसेच ‘ओम द ग्लोबल आर्ट सेंटर’ आणि ‘आरे म्युझियम’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र बोरलेपवार, मयुरी बोरलेपवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्राला अजिंठा-वेरूळच्या लेण्यांपासून वारली चित्रकलेपर्यंत समृद्ध कलापरंपरा लाभल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी नमूद केले.
कलाकारांना प्रोत्साहन आणि महिलांचा सहभाग
कला क्षेत्रातील महिलांचा सहभाग महत्त्वाचा असून अधिकाधिक मुलींना कलाशिक्षण आणि व्यावसायिक संधी मिळण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. दृश्य कला हा विषय सांस्कृतिक कार्य विभागाकडे वर्ग करण्याबाबत सकारात्मक प्रयत्न करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली. तसेच, चित्रकार व शिल्पकारांच्या कलानिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी राजाश्रय वाढविण्याची आवश्यकता असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.
या राष्ट्रीय कला परिसंवादात देशाच्या विविध भागांतून सहभागी झालेल्या २१ चित्रकार व शिल्पकारांचा शाल आणि प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये विनोद शर्मा, सुहास बहुलकर, चरण शर्मा, जॉन डगलस, निलेश वेडे, प्रदीप जोगदंड, रमेश चंद्र, साक्षी कदम, आनंद पांचाळ, सिद्धार्थ शिंगाडे, नितीन मिस्त्री, अमरनाथ शर्मा, प्रदीप कामिया, नीना देवांगन, वैभव मोरे, जगन्नाथ महापात्रा, दिलीप शर्मा, योगेश मुरकुटे, मान काफर, रविकुमार आणि केतन खुटले यांचा समावेश होता. कार्यक्रमात ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर यांच्या चित्राचे अनावरण करण्यात आले.
Source: Cosmo News Desk








