मुंबई | महाराष्ट्राची समृद्ध लोकसंस्कृती, परंपरा आणि कलांचा वारसा केवळ गणेशोत्सवापुरता मर्यादित न ठेवता तो वर्षभर जनमानसात जिवंत ठेवण्याच्या उद्देशाने ‘bappa.org’च्या वतीने ‘बाप्पाचा कट्टा’ हा ९० दिवसांचा सांस्कृतिक उपक्रम मुंबई आणि पुणे शहरात आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्याच्या संकल्पनेला पुढे नेत, या उपक्रमाद्वारे सर्वसामान्य कुटुंबे, मित्रमंडळी आणि सहकाऱ्यांना आपले कलागुण सादर करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. गुरुवार, २९ ऑक्टोबर २०२६ रोजी या उपक्रमाचा प्रारंभ होत असून, यामध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार आणि बाप्पा डॉट ऑर्गचे श्रीपाद आष्टेकर सहभागी होणार आहेत. या उपक्रमांतर्गत मुंबईतील वांद्रे बँडस्टँड आणि पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्ता (एफ.सी. रोड) येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. गुरुवार, २९ ऑक्टोबर रोजी मुंबईत वांद्रे बँडस्टँड येथे सायंकाळी ७ वाजता, तर पुण्यात एफ.सी. रोड येथे सकाळी १० वाजता उद्घाटन सोहळा संपन्न होईल. रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ ते २४ जानेवारी २०२७ या कालावधीत दर रविवारी रात्री ७ ते १० या वेळेत हे कार्यक्रम पार पडतील. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही.
सहभागी होण्याचे नियम आणि पारितोषिक स्वरूप
या सांस्कृतिक उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी ‘bappa.org’च्या +९१ ९१३६१ ७२६८१ या व्हॉट्सॲप क्रमांकावर आपल्या सादरीकरणाचा ३० सेकंदांचा ऑडिशन व्हिडिओ पाठवणे आवश्यक आहे. कुटुंबीय, मित्र, सहकारी, विद्यार्थी-शिक्षक किंवा एकत्र राहणाऱ्या व्यक्तींच्या जोड्या यात भाग घेऊ शकतात. मात्र, जोडीतील किमान एका सदस्याचे वय १८ ते ३५ वर्षे असणे बंधनकारक आहे. सादरीकरण कोणत्याही भारतीय भाषांमध्ये करता येईल, परंतु त्यात मराठीतील किमान एक ओळ असणे अनिवार्य असेल. प्रत्येक शहरातून दर आठवड्याला १६ जोड्यांची निवड केली जाईल आणि विजेत्यांची निवड व्हॉट्सॲपद्वारे होणाऱ्या सार्वजनिक मतदानाद्वारे होईल. प्रत्येक मोबाईल क्रमांकावरून आठवड्यातून एकदाच मतदान करता येणार आहे. प्रत्येक शहरात साप्ताहिक स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे पाच हजार, तीन हजार आणि दोन हजार रुपयांची रोख पारितोषिके दिली जातील. तसेच विजेत्यांना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य स्वरूपातील ‘मोदक करंडक’ प्रदान करण्यात येणार आहेत. प्रत्येक कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यूट्यूबवर केले जाणार असून, दर आठवड्याला सेलिब्रिटी सह-यजमान कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहतील.
विविध संकल्पना आणि महाअंतिम सोहळा
उखाणे, मंगळागौरीचे खेळ, भोंडला, पोवाडा, लोककला, म्हणी, अंताक्षरी, हिप-हॉप, रॅप, जुन्या नाटकांतील प्रसंग तसेच तिळगुळाचे उखाणे यांसारख्या पारंपरिक आणि आधुनिक कलांच्या संगमातून हा सांस्कृतिक कट्टा रंगणार आहे. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या जोडप्यांना महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीशी संबंधित कलाप्रकार तीन मिनिटांत सादर करता येईल. या उपक्रमाचा भव्य महाअंतिम सोहळा प्रजासत्ताक दिनी, मंगळवार, २६ जानेवारी २०२७ रोजी मुंबईतील वांद्रे बँडस्टँड येथे आयोजित केला जाईल आणि पुण्यातही त्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. या महाअंतिम सोहळ्यात मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते ‘कलाधिपती करंडक’ प्रदान केला जाईल, तसेच चंद्रोदयाच्या वेळी ‘६४ कलांचा मोदक’ सादर करण्यात येईल. महाराष्ट्राची लोककला आणि सांस्कृतिक परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवून सर्वसामान्य नागरिकांना या वारशाच्या जतनात सक्रिय सहभागी करून घेणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. त्यामुळे मुंबई आणि पुणे येथील नागरिकांनी मोठ्या संख्येने या सांस्कृतिक सोहळ्यांना उपस्थित राहून सहभागी कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन मंत्री ॲड. आशिष शेलार आणि श्रीपाद आष्टेकर यांनी केले आहे.
Source: Cosmo News Desk






