अमरावती | अमरावती विभागातील जास्तीत जास्त ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदा मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाच्या स्पर्धेत पात्र व्हाव्यात, यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे. लोकसहभाग वाढवून आणि नवीन शासन निर्णयातील निकषांचे तंतोतंत पालन करून हे अभियान विभागात यशस्वी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. या अभियानाबाबत अमरावती विभागाच्या पाचही जिल्ह्यांतील जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांचे प्रकल्प संचालक आणि सर्व तालुक्यांच्या गट विकास अधिकाऱ्यांसाठी एका विभागीय कार्यशाळेचे शुक्रवारी दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
अभियानातील आठ घटक आणि नियोजनाचे सादरीकरण
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या ११ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयातील विविध घटकांवर या कार्यशाळेत सविस्तर मार्गदर्शन आणि चर्चा करण्यात आली. यामध्ये सुशासन पंचायत, सक्षम पंचायत, जलसमृध्द गाव, स्वच्छ व हरीत गाव, योजनांचे अभिसरण, संस्था बळकटीकरण, उपजीविका विकास, सामाजिक न्याय तसेच लोकसहभाग आणि श्रमदान या आठ प्रमुख घटकांचा समावेश होता. कार्यशाळेदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या संबंधित जिल्ह्याच्या नियोजनाचे सादरीकरण केले. तसेच विभागातील प्रत्येक जिल्ह्यातून दोन पंचायत समित्यांच्या गट विकास अधिकाऱ्यांनी पंचायत समित्यांच्या नियोजनाची माहिती सादर केली. या कार्यशाळेत विभागस्तरावरून विभागीय आयुक्त नयना गुंडे यांच्यासह अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, अपर आयुक्त विकास शालिनी कडू आणि सहाय्यक आयुक्त विकास राजीव फडके उपस्थित होते. याशिवाय, जिल्हास्तरावरून विभागातील चारही जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व पंचायत समित्यांचे गट विकास अधिकारी व कर्मचारी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
आरोग्य अभियान आणि इतर विकास कामांचा आढावा
राज्यातील आरोग्य सेवांमध्ये गुणात्मक सुधारणा घडवून आणणे, प्रत्येक नागरिकाला मूलभूत आरोग्य सुविधा पुरवणे, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजार कमी करून त्यांचे निर्मूलन करणे आणि माता व बालकांचे आरोग्य सुधारणे या उद्देशाने राज्य शासनाने प्रभावी अभियान सुरू केले आहे. शासनाच्या प्रजा निरोगी तर राज्य सशक्त या तत्त्वज्ञानावर आधारित माझं गाव, आरोग्य संपन्न गाव हे अभियान राज्यात राबवले जात आहे. नागरिकांना सुदृढ बनवण्यासाठी सर्व ग्रामपंचायती व आरोग्य संस्थांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, अशी सूचना श्रीमती गुंडे यांनी केली. याशिवाय, विभागीय आयुक्तांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा तालुकानिहाय आढावा घेत उर्वरित घरकुलांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच टंचाईच्या काळात चारा लागवड, नेपीयर गवत लागवड, जलसंधारणाची कामे, उपजीविका आणि व्हीबीजी रामजी अंतर्गत विविध कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
Source: Cosmo News Desk










