मालेगाव | दिवाळीच्या सणानिमित्त मालेगाव तालुक्यातील गाळणे गावाला शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी ग्रामस्थांसोबत आनंदाचे क्षण व्यतीत केले. श्री गुरु गोरक्षनाथ शिवपंचायतन मंदिरातील आध्यात्मिक प्रवचनास उपस्थिती, ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद आणि स्नेहभोजन अशा विविध कार्यक्रमांतून त्यांनी गावकऱ्यांशी आपुलकीचा संवाद साधला. या प्रसंगी गावाच्या सर्वांगीण विकासाच्या वाटचालीबाबतही सविस्तर चर्चा झाली.
आध्यात्मिक प्रवचन आणि जीवनमूल्यांचा संदेश
गाळणे येथील श्री गुरु गोरक्षनाथ शिवपंचायतन मंदिराच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात श्रावण महाराज कुकाणेकर यांचे प्रवचन पार पडले. मानवता, अहिंसा, संस्कार, शिक्षण आणि निसर्गसंवर्धन या जीवनमूल्यांची महती त्यांनी विशद केली. दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी ‘पाणी आणि वाणी कमी वापरा’ हा संदेश दिला. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी ग्रामस्थांसमवेत या प्रवचनाचे श्रवण केले. याप्रसंगी महंत डॉ. योगी विलास नाथ, सरपंच बापू बिचकुले, ग्रामसेवक अशोक शेवाळे यांच्यासह गाळणे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामविकास आणि सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत चर्चा
आध्यात्मिक वातावरणानंतर मंत्री दादाजी भुसे यांनी ग्रामस्थांशी गावाच्या विकासाबाबत चर्चा केली. गावाच्या गरजा, स्थानिक प्रश्न, पायाभूत सुविधांची आवश्यकता आणि प्रस्तावित विकास कामांच्या नियोजनाविषयी त्यांनी माहिती जाणून घेतली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर परिसराच्या विकासाला चालना देण्यासाठी आवश्यक असलेल्या नियोजनाबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांच्या अपेक्षा जाणून घेत स्थानिक गरजांनुसार विकासकामांची दिशा ठरविण्याच्या दृष्टीने हा संवाद महत्त्वपूर्ण ठरला. या भेटीत ग्रामस्थांसमवेत स्नेहभोजनही पार पडले, ज्यामध्ये मंत्री श्री. भुसे यांनी सर्वांसोबत भोजनाचा आस्वाद घेत मनमोकळ्या गप्पा मारल्या.
Source: Cosmo News Desk









