नाशिक | मालेगाव तालुक्यातील गाळणे गावात दिवाळीच्या मंगलपर्वात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी ग्रामस्थांसोबत आनंदाचे क्षण घालवले. श्री गुरु गोरक्षनाथ शिवपंचायतन मंदिरातील आध्यात्मिक प्रवचनात सहभाग, ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद आणि स्नेहभोजन याद्वारे त्यांनी गावकऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित केले. यावेळी गावाच्या सर्वांगीण विकासाच्या वाटचालीवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
आध्यात्मिक प्रवचन आणि मोलाचा संदेश
गाळणे येथील श्री गुरु गोरक्षनाथ शिवपंचायतन मंदिराच्या सभागृहात श्रावण महाराज कुकाणेकर यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. मानवता, अहिंसा, संस्कार, शिक्षण आणि निसर्गसंवर्धन या जीवनमूल्यांवर त्यांनी विचार मांडले. दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा सांभाळून वापर करण्याचे आवाहन करत त्यांनी ‘पाणी आणि वाणी कमी वापरा’ हा मोलाचा संदेश दिला. या कार्यक्रमास महंत डॉ. योगी विलास नाथ, सरपंच बापू बिचकुले, ग्रामसेवक अशोक शेवाळे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामविकास आणि स्नेहभोजन
आध्यात्मिक वातावरणानंतर मंत्री दादाजी भुसे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत गावाच्या विकासाबाबत चर्चा केली. स्थानिक प्रश्न, पायाभूत सुविधा आणि प्रस्तावित विकास कामांच्या नियोजनाविषयी माहिती जाणून घेतली तसेच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर परिसराच्या विकासाबाबतही चर्चा झाली. यानंतर मंदिर परिसरात ग्रामस्थांसमवेत स्नेहभोजन झाले. आध्यात्मिकता, सामाजिक बांधिलकी आणि ग्रामविकास यांचा सुंदर संगम घडवणारी ही दिवाळी भेट ग्रामस्थांच्या स्मरणात राहणारी ठरली.
Source: Cosmo News Desk








