फळशेत | रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील फळशेत गावातील ग्रामस्थ, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि मुंबईत वास्तव्यास असलेले गावकरी यांनी एकत्र येत करदा नदीवर जलसंधारणाचे महत्त्वपूर्ण काम पूर्ण केले आहे. शासकीय योजनांना ग्रामस्थांच्या सामूहिक इच्छाशक्तीची जोड मिळाल्यास परिवर्तनाची नवी दिशा निर्माण होऊ शकते, याचा प्रत्यय या मोहिमेतून आला आहे. गावातील दोन जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली असून एका नवीन वनराई बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली आहे. या माध्यमातून फळशेत ग्रामस्थांनी लोकसहभागातून ग्रामविकासाचा एक प्रेरणादायी वस्तुपाठ निर्माण केला आहे.
श्रमदान मोहीम आणि नियोजन
पाण्याचे महत्त्व ओळखून त्याच्या संवर्धनासाठी कृती करण्याचा निर्धार करत ‘एक दिवस फळशेत गावासाठी, पाण्याचा थेंब अन् थेंब जिरवण्यासाठी’ हा संकल्प करण्यात आला. या संकल्पापायी रविवार, ८ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता करदा नदी परिसरात विशेष श्रमदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेच्या मागे महिनाभरापासून सुरू असलेली पूर्वतयारी होती. फळशेत ग्रामस्थ आणि फळशेत मुंबई मंडळाच्या सुमारे ८० शिलेदारांनी या मोहिमेत सहभाग घेतला. या मोहिमेत पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्यास मदत व्हावी आणि स्थानिक जलस्रोतांचे संवर्धन व्हावे, हा प्रमुख उद्देश होता. मुंबईत स्थायिक झालेले ग्रामस्थ दिवाळीच्या सुट्ट्यांच्या काळात या मोहिमेत सहभागी झाले होते. श्रमदान करणाऱ्यांसाठी भोजन आणि अन्य आवश्यक व्यवस्था श्री. यशवंत नाक्ती आणि बाईत मंडळी यांनी सांभाळली.
तांत्रिक अचूकता आणि पर्यावरण संवर्धन
या मोहिमेदरम्यान कामाच्या नोंदींमध्ये तांत्रिक अचूकता राखण्यावर विशेष भर देण्यात आला. शासकीय निकषांनुसार उपक्रमांतर्गत करण्यात आलेल्या कामांची छायाचित्रे जीपीएस मॅप कॅमेऱ्याच्या माध्यमातून घेण्यात आली आणि त्यांचे जिओटॅगिंग करून अक्षांश-रेखांश नोंदविण्यात आले. तसेच आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता राखत खर्चाचा हिशोब व्यवस्थित ठेवण्यात आला. जलसंधारणाबरोबरच पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी बंधाऱ्यांच्या दोन्ही बाजूंना रोपांची लागवड करून परिसर हरित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा उपक्रम शासनाच्या जलयुक्त शिवार अभियान २.० तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २.० यांच्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे.
Source: Cosmo News Desk











