नाशिक | पुरेशा पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. पशुधनाचा पाणी व चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्यात येत असून, धरणांमधील गाळ काढून साठवण क्षमता वाढविणे आणि कालव्यांची गळती रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले आहेत. वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्था, मोहाडी आणि पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वाघाड धरण जलपूजन सोहळा व मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ होते.
कार्यक्रमास खासदार भास्कर भगरे, दिंडोरीच्या नगराध्यक्षा आशा कराटे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता अरुण नाईक, अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे, नांदूर मध्यमेश्वरचे कार्यकारी अभियंता मनोज ढोकचवले, वैभव भागवत, कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष शहाजी सोमवंशी, तहसीलदार मुकेश कांबळे, गटविकास अधिकारी सुनील पाटील, उपअभियंता संभाजी पाटील यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. मंत्री डॉ. विखे-पाटील यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रगतीचे कौतुक केले. तसेच पाणी वापर संस्थेला राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.
धरणांमधील गाळ आणि जलव्यवस्थापन
धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे पाणीसाठवण क्षमतेवर परिणाम होत असल्याचे सांगून मंत्री डॉ. विखे-पाटील म्हणाले की, राज्यातील जलसाठ्यांची क्षमता टिकविण्यासाठी गाळ काढण्याच्या कामाला महत्त्व द्यावे लागेल. वाघाड धरणातील गाळाचे प्रमाण आणि आवश्यक उपाययोजनांचा अभ्यास करून परवानगी देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. बंद पाणीवापर संस्था पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. पाणीपट्टीची वसुली करून संकलित निधीचा उपयोग कालव्यांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी करावा. पाण्याचा काटेकोर हिशेब ठेवणे ही काळाची गरज असून पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी.
दुष्काळी उपाययोजना आणि पर्यटन विकास
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी चारा डेपो सुरू करण्यात येणार आहेत. पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांनी वाघाड धरणातील गाळ काढण्यासाठी जलसंपदा विभागाने कार्यवाही करावी आणि धरणाच्या विकासासाठी कृती समिती स्थापन करावी असे सांगितले. तसेच वाघाड धरण परिसरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी विश्रामगृह उभारण्याबाबत नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. कार्यक्रमात खासदार श्री. भगरे यांनी मार्गदर्शन केले व प्रास्ताविकात अधीक्षक अभियंता श्री. गोवर्धन यांनी विविध प्रकल्पांची माहिती दिली.
Source: Cosmo News Desk







