Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • राजस्थानमध्ये धुळेकरांच्या वाहनाचा भीषण अपघात, ९ जणांचा मृत्यू
Nashik

राजस्थानमध्ये धुळेकरांच्या वाहनाचा भीषण अपघात, ९ जणांचा मृत्यू

नाशिक | राजस्थानमधील कोटा-उदयपूर महामार्गावर शंभुपुरा गावाजवळ धुळे जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनाला एक भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला असून, इतर सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. खाटू श्याम मंदिराचे दर्शन घेऊन धुळे जिल्ह्यातील आपल्या गावी परतणाऱ्या भाविकांच्या क्रूझर वाहनाची महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक बसल्यामुळे हा अपघात घडला. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन तातडीने सक्रिय झाले असून त्यांनी मदतकार्याचा आढावा घेतला आहे.

प्रशासन आणि अधिकाऱ्यांशी साधला संवाद

अपघाताची माहिती समजताच मंत्री गिरीश महाजन यांनी कोटा येथील जिल्हाधिकारी राजेश जोशी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. जखमींना विनाविलंब तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून द्यावेत, तसेच गरज पडल्यास त्यांना अधिक चांगल्या आणि अद्ययावत वैद्यकीय सुविधा असलेल्या रुग्णालयात दाखल करावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. तसेच, मंत्री महाजन यांनी राजस्थानमधील पोलिस प्रशासन, स्थानिक प्रशासन आणि शासकीय रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून सद्यःस्थितीची माहिती जाणून घेतली.

मदतकार्य आणि उपचारांना प्राधान्य

अपघातातील जखमींना सर्वोत्तम उपचार मिळावेत आणि उपचारांमध्ये कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. मृतांच्या पार्थिवांना सन्मानपूर्वक त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत लवकरात लवकर मूळगावी पोहोचविण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय व वाहतूक व्यवस्था तात्काळ करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. महाराष्ट्र शासन या दुःखदप्रसंगी पीडित कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Source: Cosmo News Desk

Related Posts