नाशिक | आदिवासी समाजाचे महानायक क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त राज्य शासनाच्या वतीने नाशिक जिल्ह्यात ११ नोव्हेंबर २०२६ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी याबद्दल माहिती दिली असून, या सेवा सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून दिला जाणार आहे. तसेच त्यांच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाला चालना देण्याचा यामागे उद्देश आहे. जिल्हा व तालुकास्तरावर या सप्ताहानिमित्त विविध शासकीय कार्यक्रम, पत्रकार परिषद, जनजागृती मोहीम, लाभार्थी मेळावे, आरोग्य शिबिरे, कागदपत्र सेवा शिबिरे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत.
शासकीय योजनांचा थेट लाभ आणि विविध उपक्रम
सप्ताहाच्या पहिल्या टप्प्यात १२ नोव्हेंबर रोजी अनुसूचित जमातीबहुल तालुक्यांच्या मुख्यालयांमध्ये पत्रकार परिषदा घेऊन स्थानिक प्रश्न आणि शासकीय योजनांची माहिती दिली जाईल. १३ नोव्हेंबर रोजी न्यूक्लियस बजेट योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना धनादेश वितरित केले जातील. तसेच धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान, आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून लाभ देण्यात येणार असून कृषीपूरक व्यवसाय, सिंचन सुविधा व रोजगारासाठी मार्गदर्शन केले जाईल. १४ नोव्हेंबर रोजी आदिवासी स्मारके व पुतळ्यांची स्वच्छता करून सायंकाळी दीपोत्सवाचे आयोजन केले जाईल. १५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त मुख्य शासकीय कार्यक्रम पार पडणार असून यात प्रतिमांना माल्यार्पण, अभिवादन, समाजसेवकांचा सन्मान आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल.
आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि सांस्कृतिक सक्षमीकरण
सप्ताहाच्या पुढील दिवसांमध्ये १६ नोव्हेंबर रोजी आधार कार्ड व शासकीय कागदपत्र सेवा शिबिर आयोजित करून नागरिकांना मार्गदर्शन केले जाईल आणि वनपट्टेधारकांना लाभवाटप होईल. १७ नोव्हेंबर रोजी आरोग्य व पोषण जनजागृती शिबिरामध्ये रक्तदाब, मधुमेह, माता-बाल आरोग्य आणि सिकलसेल आजाराबाबत तपासण्या व जनजागृती केली जाणार असून पौष्टिक आहाराचे महत्त्व पटवून दिले जाईल. १८ नोव्हेंबर रोजी आदिवासी आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक सक्षमीकरण दिन आणि सप्ताहाचा समारोप होईल, ज्यामध्ये महिला बचत गट, कौशल्य विकास, शिष्यवृत्ती आणि डिजिटल साक्षरतेबाबत मार्गदर्शन केले जाईल. आदिवासी संस्कृती, परंपरा आणि ऐतिहासिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी क्रीडा स्पर्धा, शोभायात्रा आणि सांस्कृतिक मेळाव्यांचे आयोजन सर्व शासकीय विभागांच्या समन्वयातून केले जात आहे.
Source: Cosmo News Desk






