मुंबई | उत्तर महाराष्ट्रातील सिंचन विकासाला चालना देण्यासाठी आणि आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या नर्मदा-तापी वळण योजनेच्या ५ हजार ५४८ कोटी ४ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली आहे. या निर्णयामुळे नर्मदा खोऱ्यातील महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी तापी खोऱ्यात वळविण्याचा प्रकल्प प्रत्यक्षात साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जळगाव येथील तापी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला असून, यादरम्यान नर्मदा पाणी तंटा लवादाच्या अंतिम निवाड्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले पाणी तापी खोऱ्यात आणले जाणार आहे.
प्रकल्पाची रचना आणि अंमलबजावणी
या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत नर्मदा खोऱ्यात खडकी, लेकडा, वेलखेडी, मोंजरा, राजबर्डी आणि शेलकुई या ठिकाणी सहा वळणबंधारे उभारण्यात येणार आहेत. या बंधाऱ्यांद्वारे १५८.३० दशलक्ष घनमीटर म्हणजेच ५.५९ टीएमसी पाणी बोगदे व जोडकालव्यांच्या माध्यमातून जलोला धरणात आणून साठवले जाईल. त्यानंतर १९.५० किलोमीटर लांबीच्या बोगद्याद्वारे हे पाणी तापी खोऱ्यात वळवले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेतून ११.५० मेगावॅट इतकी वीजनिर्मिती देखील केली जाणार आहे. तापी खोऱ्यात आणले जाणारे पाणी गोपालपूर बंधाऱ्यात (पिकअप वेअर) साठवले जाईल आणि तेथून बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे (Pressure Distribution Network – PDN) शेतकऱ्यांना सिंचनासाठी वितरित केले जाईल. या सर्व कामांसाठी तसेच सविस्तर सर्वेक्षण, प्रकल्पाचे संकल्पन, आराखडे, वैधानिक मान्यता आणि वनजमिनीचे संपादन करण्यासाठी ५ हजार ५४८.०४ कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे.
सिंचन लाभ आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना
या प्रकल्पामुळे नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा, शहादा आणि धडगाव या तीन तालुक्यांमधील ७५ गावांतील तब्बल २६ हजार ५२६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने तळोदा तालुक्यातील १४ हजार ११६ हेक्टर, शहादा तालुक्यातील ९ हजार ४१० हेक्टर आणि धडगाव तालुक्यातील वैयक्तिक उपसा सिंचनाद्वारे ३ हजार हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. या योजनेमुळे परिसरातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता देखील वाढणार आहे. आदिवासीबहुल आणि पाणीटंचाईग्रस्त भागातील शेतीसाठी शाश्वत सिंचन सुविधा मिळाल्यामुळे पावसावरील अवलंबित्व कमी होणार असून कृषी उत्पादनात वाढ होईल. या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य बळकट होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी गती मिळण्याची अपेक्षा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे.
Source: Cosmo News Desk










