नाशिक | क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची जयंती जनजातीय गौरव दिन म्हणून साजरी केली जात असून, यानिमित्ताने नाशिक जिल्ह्यात जनजातीय गौरव सेवा सप्ताह सुरू करण्यात आला आहे. आदिवासी आयुक्तालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली. यावेळी आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, डॉ. कश्मिरा संख्ये, महानगरपालिका स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप आणि लक्ष्मण सावजी उपस्थित होते. बिरसा मुंडा हे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील महान क्रांतिकारक होते आणि त्यांनी जल, जंगल, जमीन या हक्कांसाठी संघर्ष केला.
ओझरखेड धरण परिसरात स्मारकाची उभारणी
दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड धरणाजवळ पाच एकर क्षेत्रात क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांचे भव्य स्मारक साकारण्यात येणार आहे. या कामासाठी चार कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली असून, तिथे २१ फूट उंच पुतळ्यासह वृक्षारोपण केले जाईल. यामुळे ओझरखेड धरण परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होईल आणि स्थानिक पर्यटन, रोजगार तसेच आर्थिक विकासाला चालना मिळेल. राज्य शासनाच्या ॲस्ट्रो टुरिझम धोरणांतर्गत सुरगाणा तालुक्यातील उधमाळ या ठिकाणाचाही विकास केला जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचे आयोजन
शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष सेवा सप्ताहाचे आयोजन केले आहे. यादरम्यान पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ, आवश्यक कागदपत्रे, आरोग्य सुविधा, रोजगाराच्या संधी आणि आर्थिक साहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. न्यूक्लियस बजेट योजनेंतर्गत धनादेश वाटप, आधार कार्ड व कागदपत्रे सेवा शिबिर, आरोग्य शिबिर आणि सामाजिक सक्षमीकरण दिवस साजरे केले जातील. प्रशासकीय यंत्रणा थेट आदिवासी बांधवांच्या दारापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जागेवरच सोडवण्यासाठी प्रयत्नशील असेल, असा विश्वास पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.
Source: Cosmo News Desk






