नाशिक |क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त राज्य शासनाच्या वतीने नाशिक जिल्ह्यात आजपासून १८ नोव्हेंबर २०२६ पर्यंत जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक सक्षमीकरणासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला असून, जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या सप्ताहादरम्यान जिल्हा व तालुकास्तरावर विविध शासकीय कार्यक्रम, जनजागृती मोहीम, लाभार्थी मेळावे, आरोग्य शिबिरे, कागदपत्र सेवा शिबिरे आणि क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत.
शासकीय योजना आणि आरोग्य शिबिरांचे आयोजन
सप्ताहाच्या कालावधीत १३ नोव्हेंबर रोजी न्यूक्लियस बजेट योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना धनादेश वितरित केले जातील. तसेच धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून लाभ दिला जाईल. १४ नोव्हेंबर रोजी स्मारकांची स्वच्छता आणि दीपोत्सव साजरा होईल. १५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त मुख्य शासकीय कार्यक्रम होईल. १६ नोव्हेंबर रोजी आधार कार्ड व शासकीय कागदपत्र सेवा शिबिर, १७ नोव्हेंबर रोजी आरोग्य व पोषण जनजागृती शिबिरे पार पडतील.
आदिवासी संस्कृती आणि सक्षमीकरण
१८ नोव्हेंबर रोजी आदिवासी आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक सक्षमीकरण दिन आणि सप्ताहाचा समारोप होईल. यादरम्यान महिला बचत गट, कौशल्य विकास, रोजगार, शिष्यवृत्ती आणि डिजिटल आर्थिक साक्षरतेवर मार्गदर्शन केले जाईल. आदिवासी संस्कृती, लोककला आणि परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी सांस्कृतिक मेळावे व शोभायात्रा भरवल्या जातील. हा सप्ताह आदिवासी बांधवांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवणारा लोकसहभागाचा उपक्रम ठरावा, असे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
Source: Cosmo News Desk






