पुणे | केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते भारत इतिहास संशोधक मंडळाच्या ऐतिहासिक कागदपत्रांच्या डिजिटायझेशन प्रकल्पाचे औपचारिक लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मुरकुंबी इतिहास उपक्रमाचे नरेंद्र मुरकुंबी, मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, सचिव पांडुरंग बलकवडे, कोषाध्यक्ष नंदकुमार निकम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. गेल्या ११६ वर्षांपासून भारत इतिहास संशोधक मंडळ इतिहास संशोधनाचे कार्य करत असून, मराठ्यांचा गौरवशाली इतिहास जगासमोर आणण्याच्या हेतूने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीत २०२१ मध्ये या प्रकल्पाचा शुभारंभ झाला होता आणि आता या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले आहे.
संकेतस्थळावर दुर्मिळ कागदपत्रे उपलब्ध
या प्रकल्पामुळे www.bismarchives.in या अधिकृत संकेतस्थळावर दुर्मिळ ऐतिहासिक कागदपत्रे तसेच अमूल्य वस्तूंची सचित्र माहिती उपलब्ध होणार आहे. मंडळाकडे सुमारे तीन लाख कागदपत्रे आहेत, ज्यांच्या साडेसहा लाख पृष्ठप्रतिमा टप्प्याटप्प्याने नागरिकांसाठी उपलब्ध केल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात सुमारे १० हजार ऐतिहासिक कागदपत्रे संकेतस्थळावर आणण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने बखरी, मुघल फर्माने, हस्तलिखिते, ताम्रपट, चित्रे, नकाशे, शिल्पे, शस्त्रे, शिलालेख, भूमिपत्रे आणि दुर्मिळ ग्रंथांचा समावेश आहे. मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत यांनी नमूद केले की, या माध्यमातून भारतीय इतिहासातील महत्त्वपूर्ण माहिती जागतिक स्तरावरील अभ्यासक, संशोधक आणि इतिहासप्रेमींसाठी खुली झाली आहे.
प्रकल्पाचे तांत्रिक सहकार्य आणि भागीदारी
हा महत्त्वाकांक्षी डिजिटायझेशन प्रकल्प चिन्मय भंडारी आणि मिथिलेश कुळकर्णी यांच्या न्यानसा कंपनीमार्फत माईंडस्केप हबच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मुरकुंबी इतिहास उपक्रम आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले आहे. कागदपत्रांच्या जतनामुळे आणि त्यांच्या डिजिटायझेशनमुळे संशोधनाचे काम अधिक सुलभ होणार असून येत्या काळात उर्वरित कागदपत्रांच्या पृष्ठप्रतिमाही टप्प्याटप्प्याने याच संकेतस्थळावर अभ्यासकांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
Source: Cosmo News Desk











