Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • पर्यावरण आणि आर्थिक प्रगतीचा समतोल साधत भारताने जगाला दाखवला मार्ग: प्रिन्स विल्यम
Maharashtra

पर्यावरण आणि आर्थिक प्रगतीचा समतोल साधत भारताने जगाला दाखवला मार्ग: प्रिन्स विल्यम

मुंबईत अर्थशॉट प्राईझ कार्यक्रमात बोलताना ब्रिटनचे राजपुत्र प्रिन्स विल्यम

मुंबई | ब्रिटनचे राजपुत्र आणि अर्थशॉट प्राईझचे संस्थापक अध्यक्ष प्रिन्स विल्यम यांनी मुंबईतील जिओ कन्व्हेशन सेंटर येथे आयोजित अर्थशॉट प्राईझ इम्पॅक्ट असेम्ब्ली कार्यक्रमात भाषण केले. पर्यावरणाचे रक्षण आणि आर्थिक विकास या परस्परविरोधी गोष्टी नसून, दोन्हींचा समतोल साधणे शक्य असल्याचे भारताने आपल्या कृतीतून जगाला दाखवून दिले आहे. पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, नवनवीन संकल्पना आणि लोकसहभागाच्या माध्यमातून शाश्वत विकासाचा मार्ग अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास अर्थशॉट प्राईझचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेसन कनौफ, चेअरमन जेस्पर ब्रॉडीन, अंतिम फेरीतील स्पर्धक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. भारताच्या पर्यावरणपूरक विकासाचा उल्लेख करताना त्यांनी अक्षय ऊर्जा क्षेत्रातील प्रगतीचे विशेष कौतुक केले. भारताने स्थापित वीज निर्मिती क्षमतेपैकी ५० टक्के क्षमता बिगरजीवाश्म ऊर्जा स्रोतांमधून निर्माण करण्याचे उद्दिष्ट निर्धारित मुदतीच्या पाच वर्षे आधीच साध्य केले आहे, तसेच गेल्या दशकभरात देशाची सौरऊर्जा क्षमता ५० पटींहून अधिक वाढली आहे.

भारतीय नवकल्पना आणि जागतिक योगदान

अर्थशॉट प्राईझमध्ये भारताचे योगदान महत्त्वपूर्ण असून, या पुरस्काराच्या इतिहासात सर्वाधिक विजेते आणि अंतिम फेरीतील स्पर्धक भारतातून असल्याचे प्रिन्स विल्यम यांनी अधोरेखित केले. २०२१ मध्ये ‘क्लीन अवर एअर’ विभागात पुरस्कार मिळविणाऱ्या ‘टकाचार’ या भारतीय संस्थेचे त्यांनी उदाहरण दिले. शेतीतील पिकांचे अवशेष आणि जंगलातील कचरा जाळण्याऐवजी त्यापासून इंधन व खतासारखी विक्रीयोग्य उत्पादने तयार करणारे पोर्टेबल तंत्रज्ञान या संस्थेने विकसित केले आहे. यामुळे धुराचे उत्सर्जन ९८ टक्क्यांनी कमी झाले असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. तसेच २०२६ च्या अर्थशॉट प्राईझच्या अंतिम फेरीतील दोन भारतीय उपक्रमांचा त्यांनी गौरव केला. ‘महिला हाउसिंग ट्रस्ट’ कमी उत्पन्न गटातील महिलांना थंड छतांसारख्या उपाययोजना आणि परवडणाऱ्या विमा सुविधांद्वारे मदत करत आहे, तर ‘महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटी’ परवडणाऱ्या इलेक्ट्रिक रिक्षांच्या माध्यमातून शहरी भागातील प्रदूषण कमी करत आहे. जगाला पहिली एक टेरावॅट सौरऊर्जा क्षमता उभारण्यासाठी ७० वर्षे लागली, मात्र दुसरी एक टेरावॅट क्षमता अवघ्या दोन वर्षांत उभारली गेली.

शाश्वत भविष्यासाठी सहकार्याचे आवाहन

पर्यावरणीय समस्यांवर उपाय शोधण्याची जबाबदारी केवळ एका देशाची किंवा संस्थेची नसून विविध देशांनी एकमेकांच्या अनुभваंतून शिकण्याचे आवाहन त्यांनी केले. स्वच्छ वाहतूक, अक्षय ऊर्जा, शेती विमा आणि घातक रसायनांवर नियंत्रण या क्षेत्रांत जगभरात उल्लेखनीय काम सुरू आहे. आपल्या भाषणात हिंदीतील ‘रंगबिरंगी दुनिया’ या शब्दप्रयोगाचा उल्लेख करत त्यांनी भविष्याकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याचे आवाहन केले. विकास की पर्यावरण, समृद्धी की निसर्गसंवर्धन या द्वंद्वात्मक विचारांपलीकडे जाण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. अर्थशॉट प्राईझच्या माध्यमातून गेल्या सहा वर्षांत अनेक प्रभावी उपाय समोर आले असून, या नवकल्पना शोधणे, त्यांना आर्थिक व सामाजिक पाठबळ देणे आणि त्यांचा जगभर विस्तार करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. शासन, उद्योगजगत आणि नागरिकांनी अंतिम फेरीतील स्पर्धकांना आपल्या कल्पना, प्रभाव आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.

Source: Cosmo News Desk

Related Posts