नागपूर | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रस्तावित लोहारी सावंगा गावाच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यातील या गावाची सामाजिक, आर्थिक आणि कृषी विषयक वैशिष्ट्ये महत्त्वाची ठरत आहेत. शेतीला केंद्रस्थानी ठेवून ग्रामविकासाची वाटचाल करणाऱ्या या गावाला ऐतिहासिक वारसा लाभला असून, ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाची खरी ओळख या गावातून दिसून येते. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील या गावाची ग्रामपंचायत १९४८ मध्ये स्थापन झाली असून, या गावाने काळानुरूप विकासाचा प्रवास सुरू ठेवला आहे.
गावाची लोकसंख्या आणि प्रशासकीय रचना
लोहारी सावंगा ग्रामपंचायतीची स्थापना १९४८ मध्ये झाली असून सध्याच्या ग्रामपंचायत सदस्यांची संख्या १२ आहे. यामध्ये सात महिला आणि पाच पुरुष सदस्यांचा समावेश आहे. २०११ च्या जनगणनेनुसार गावाची एकूण लोकसंख्या ४ हजार २६४ आहे, ज्यामध्ये २ हजार ४१४ पुरुष आणि १ हजार ८५० महिलांचा समावेश आहेत. गावात एकूण ८४४ कुटुंबे असून त्यापैकी ५९० कुटुंबे एपीएल आणि २५४ कुटुंबे बीपीएल प्रवर्गातील आहेत. तसेच गावाची प्रशासकीय रचना चार वॉर्डांमध्ये विभागलेली असून २०२६ च्या नोंदीनुसार गावातील एकूण मतदारसंख्या २ हजार ४०० आहे. गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ ९७९.१९ चौरस हेक्टर आर आहे.
कृषी अर्थव्यवस्था आणि पाणीपुरवठा व्यवस्था
लोहारी सावंगा गावाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार शेती आहे. गावातील प्रमुख पिकांमध्ये कापूस, तूर, संत्रा, मोसंबी, सोयाबीन, हरभरा आणि गहू यांचा समावेश होतो. पारंपरिक पिकांसोबतच फळबागांच्या माध्यमातून शेतीला उत्पन्नाचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. विदर्भातील कृषी अर्थव्यवस्थेचे प्रतिबिंब या गावातील पीकपद्धतीतून दिसून येते. याशिवाय गावामध्ये एकूण ८१० नळजोडणी खातेदार असल्याची नोंद आहे, जी ग्रामीण भागातील पाणीपुरवठा व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीमुळे गावातील नागरिकांच्या अपेक्षा, ग्रामीण विकासाचे प्रश्न आणि शेतीसमोरील आव्हानांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
Source: Cosmo News Desk











