मुंबई | पुस्तकांना भौगोलिक सीमा नसून समाज घडविण्याची अभूतपूर्व ताकद ग्रंथांमध्ये असते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. २४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘मुंबई पुस्तक महोत्सव २०२६’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. केंद्रीय शिक्षण मंत्रालय, नॅशनल बुक ट्रस्ट, महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या सहभागाने हा महोत्सव होत आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सात पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले तसेच बालकांसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष दालनाला व पुस्तकांच्या दालनाला भेट देऊन पाहणी करण्यात आली. या कार्यक्रमास सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, महापौर रितू तावडे, महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे, मुख्य आयोजक आमदार अमित साटम, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार पराग अळवणी, मुख्य संयोजक आचार्य पवन त्रिपाठी, कुलगुरु प्रा. रवींद्र कुलकर्णी उपस्थित होते.
मुंबईची संस्कृती आणि ग्रंथसंपदा
मुंबईने मराठी संस्कृती, अस्मिता आणि भाषा जपली असून मुंबईत कला, साहित्य आणि संस्कृतीला नेहमीच पोषक वातावरण मिळाले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. बाळशास्त्री जांभेकर यांचे ‘दर्पण’सारखे नियतकालिक मुंबईतच सुरू झाले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपली विविध नियतकालिके मुंबईतूनच सुरू करून वंचितांचा आवाज बुलंद केला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य दूर रशियात पोहोचले ते पुस्तकांच्या आणि ग्रंथांच्या चळवळीतूनच शक्य झाले. आज आपण ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करीत असून ‘एआय’च्या जगातही ग्रंथांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तंत्रज्ञानाला मूल्य संवेदना समजू शकत नाही त्यासाठी मानवी संवेदनाच हव्या असतात. ‘ज्ञान भारतम्’च्या माध्यमातून प्राचीन हस्तलिखिते जतन करण्याची मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे.
महोोत्सवाचे स्वरूप आणि विविध उपक्रम
हा महोत्सव मुंबईकरांसाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरणार असून आता हा पुस्तक महोत्सव मुंबईत दरवर्षी आयोजित होणार आहे. महोत्सवात ६०० हून अधिक पुस्तकांचे स्टॉल, २०० पेक्षा अधिक साहित्यिक सत्रे, बालकांसाठीचे २० हून अधिक उपक्रम आणि ९५ हून अधिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी साहित्यप्रेमींसाठी ‘लेखक मंच-२ (मराठी मंच)’ या विशेष व्यासपीठावर ५० सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी कथाकथन, चित्रकला, लेखन, वाचन आणि प्रश्नमंजुषा यांसारखे बालउपक्रम आयोजित केले आहेत. महोत्सवात ‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्षानिमित्त विशेष प्रदर्शन, महात्मा जोतीराव फुले आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त विशेष प्रदर्शने मांडण्यात आली आहेत. हा महोत्सव मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथील गेट क्रमांक २ येथे होत आहे.
Source: Cosmo News Desk











