Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • जर्मनीच्या लोअर सॅक्सोनी उद्योजकांना मुख्यमंत्र्यांचे महाराष्ट्रात गुंतवणुकीचे आवाहन
Maharashtra

जर्मनीच्या लोअर सॅक्सोनी उद्योजकांना मुख्यमंत्र्यांचे महाराष्ट्रात गुंतवणुकीचे आवाहन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लोअर सॅक्सोनी शिष्टमंडळाची बैठक

मुंबई | महाराष्ट्राचे आर्थिक सामर्थ्य, कुशल मनुष्यबळ, वेगाने विस्तारणारी बाजारपेठ आणि वैविध्यपूर्ण औद्योगिक परिसंस्था यामुळे जर्मनीच्या लोअर सॅक्सोनी राज्यातील उद्योगांसाठी राज्यात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोअर सॅक्सोनीचे मंत्री-अध्यक्ष ओलाफ लाईस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासमवेत वर्षा निवासस्थानी झालेल्या चर्चेदरम्यान जर्मन उद्योगांना महाराष्ट्रात उत्पादनासह संशोधन आणि विकास केंद्रे उभारण्याचे आवाहन केले. या बैठकीत उभय राज्यांतील सहकार्याचा कृती आराखडा मांडण्यात आला असून, भागीदारीला ठोस स्वरूप देण्यासाठी वरिष्ठ शासकीय अधिकारी, उद्योग प्रतिनिधी आणि शैक्षणिक संस्थांचा समावेश असलेला ‘महाराष्ट्र-लोअर सॅक्सोनी संयुक्त कार्यगट’ स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि लोअर सॅक्सोनीची एकत्रित अर्थव्यवस्था सुमारे एक ट्रिलियन अमेरिकी डॉलरची असून, देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात महाराष्ट्राचा सुमारे १५ टक्के वाटा आहे.

आर्थिक उद्दिष्टे आणि विविध क्षेत्रांतील सहकार्य

राज्याने २०३० पर्यंत एक ट्रिलियन डॉलर आणि २०४७ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मुंबईतील वित्तीय आणि तंत्रज्ञान परिसंस्था, पुण्यातील वाहन व अभियांत्रिकी उद्योग, नागपूरची दळणवळण क्षमता तसेच नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमधील उत्पादन समूह राज्याच्या विकासाला गती देत आहेत. प्रगत उत्पादन आणि भविष्यकालीन वाहन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात फोक्सवॅगन हा महाराष्ट्र आणि लोअर सॅक्सोनीमधील महत्त्वाचा औद्योगिक दुवा आहे. फोक्सवॅगनने २००१ पासून महाराष्ट्रात सुमारे १.१ अब्ज युरोची गुंतवणूक केली असून, राज्यातील कंपनीच्या प्रकल्पांमध्ये चार हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. अचूक अभियांत्रिकी, औद्योगिक स्वयंचलन, रोबोटिक्स, सेमीकंडक्टर, बॅटरी, एरोस्पेस आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांत सहकार्याच्या व्यापक संधी आहेत. तसेच हरित ऊर्जा आणि औद्योगिक परिवर्तनासाठी पवनऊर्जा, हरित हायड्रोजन, बॅटरी तंत्रज्ञान आणि कमी कार्बन उत्सर्जनाच्या पोलाद उत्पादनातील कौशल्य महाराष्ट्रासाठी उपयुक्त ठरेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

शैक्षणिक सहकार्य आणि शिष्टमंडळाचे आमंत्रण

नवी मुंबईत उभारण्यात येणाऱ्या एज्युसिटीमध्ये लोअर सॅक्सोनीतील विद्यापीठे, संशोधन संस्था आणि उद्योगांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले असून संयुक्त संशोधन कार्यक्रम, दुहेरी पदवी अभ्यासक्रम व विद्यार्थी देवाणघेवाणीसाठी राज्य शासन सहकार्य करेल. लोअर सॅक्सोनीचे मंत्री-अध्यक्ष ओलाफ लाईस यांनी वाहन उद्योग, संरक्षण व सुरक्षा तंत्रज्ञान, डिजिटलायझेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रांत दोन्ही राज्यांमध्ये मोठी क्षमता असल्याचे नमूद केले. भारत-युरोपीय संघ मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटींमुळे अतिरिक्त गुंतवणूक आणि सहकार्यासाठी नव्या संधी मिळतील. लाईस यांनी लोअर सॅक्सोनीमधील संरक्षण प्रदर्शनासाठी मुख्यमंत्री व महाराष्ट्रातील संरक्षण उद्योगांच्या प्रतिनिधींना आणि हॅनोव्हर येथील आंतरराष्ट्रीय औद्योगिक व्यापार मेळ्यासाठी राज्याच्या व्यावसायिक शिष्टमंडळाला निमंत्रित केले आहे. या बैठकीस दोन्ही देशांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

Source: Cosmo News Desk

Related Posts