रत्नागिरी | पावसाच्या लहरीपणामुळे भात पिकाचे मोठे नुकसान झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राजापूर, मंडणगड आणि रत्नागिरी तालुक्यातील शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची अग्रिम आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. यंदाच्या हंगामात पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे पिके कोमेजून गेली होती, ज्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले होते. या परिस्थितीची दखल घेत शासन आणि प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत.
प्रशासन आणि पंचनामे
कृषी विभाग, महसूल विभाग, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त पथकाने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले. या जलद प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले. राजापूर तालुक्यातील गोठणे दोनिवडे येथील शेतकरी श्रीधर हातणकर यांनी सुमारे ३० गुंठे भातशेती केली होती, जी पावसाअभावी नष्ट झाली. मंडणगड तालुक्यातील आंबडवे येथील शेतकरी दीपक जाकण आणि रत्नागिरी तालुक्यातील देऊळ येथील भात उत्पादक शेतकरी मिलिंद देसाई यांनीही यंदाच्या कमी पावसामुळे पिकांचे अमाप नुकसान झाल्याचे सांगितले. प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता वस्तुनिष्ठ पंचनामे केले आणि अहवाल शासनाकडे सादर केला.
दिवाळीत बँक खात्यात जमा झाले ५ हजार रुपये
पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळी भेट म्हणून ५ हजार रुपयांची अग्रिम मदतथेट जमा करण्यात आली. ऐन सणासुदीच्या काळात हातात मदत पडल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. श्रीधर हातणकर, दीपक जाकण आणि मिलिंद देसाई या शेतकऱ्यांनी संकटकाळात आधार दिल्याबद्दल महाराष्ट्र शासन, कृषी विभाग, महसूल विभाग, ग्रामपंचायत आणि जिल्हा प्रशासनाचे मनापासून आभार मानले आहेत. निसर्गाच्या लहरीपणाने डोळ्यांत पाणी आणले असताना सणाच्या तोंडावर मिळालेली ही तातडीची मदत शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरली आहे.
Source: Cosmo News Desk










