चंद्रपूर | संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीत पशुधन जिवंत ठेवण्यासाठी प्रशासनासह नागरिकांनी आतापासूनच चारा आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्याचे आवाहन आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले आहे. भद्रावती तालुक्यातील आष्टी (काकडे) गावातील तलावामध्ये शुक्रवारी मका चाऱ्याची लागवड करून जिल्हास्तरीय चारा लागवड उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला वरोराचे आमदार करण देवतळे, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, भद्रावतीचे गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांच्यासह विविध अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
महिला बचत गटांच्या माध्यमातून चारा लागवड आणि सक्षमीकरण
आष्टी (काकडे) गावातून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून, जिल्ह्यातील पाच माजी मालगुजारी आणि लघु पाटबंधारे तलावामध्ये महिला बचत गटांच्या माध्यमातून चारा लागवड केली जात आहे. या माध्यमातून महिला बचत गटांचे आर्थिक सक्षमीकरण होत आहे. चारा लागवडीची ही लोकचळवळ जिल्ह्यात इतर ठिकाणीही राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम आपल्या पशुधनासाठी आहे अशी भावना प्रत्येक गावकऱ्याच्या मनात असली पाहिजे, असे पालकमंत्री डॉ. उईके यांनी स्पष्ट केले. लोकांच्या सहभागातूनच चळवळ उभी राहते आणि महिलांनी पुढाकार घेतल्यास निश्चितच परिवर्तन घडते, असे त्यांनी नमूद केले. चंद्रपूर जिल्हा चारा लागवड आणि पाणी व्यवस्थापनात महाराष्ट्रात अग्रेसर राहावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासकीय नियोजन आणि मार्गदर्शन
कार्यक्रमादरम्यान आमदार करण देवतळे यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रात पाणी व चारा टंचाईचे नियोजन केले असल्याचे सांगून, गावकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. दुष्काळात चारा व पाणी टंचाईवर लोकसहभागातून निश्चित मात करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तत्पूर्वी, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. सुहास रोडे, पशुधन विकास अधिकारी डॉ. सतीश अगडते आणि डॉ. प्रमोद जल्लेवार यांनी निकृष्ट चारा सकस करणे, मुरघास, अझोला प्रात्यक्षिकासह चारा साक्षरता अभियान व संवर्धन योजनेची सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी नागरिकांना मोफत वैरण बियाणे व ठोंब्याचे वाटप करण्यात आले. पालकमंत्र्यांच्या हस्ते मका वैरण बियाण्याची पेरणी करून या जिल्हास्तरीय उपक्रमाची अधिकृत सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांनी केले, संचालन विस्तार अधिकारी प्रणाली भागवत यांनी तर आभार डॉ. सतीश अगडते यांनी मानले.
Source: Cosmo News Desk








