मुंबई | महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे बंद करण्यात आलेले निवृत्तिवेतन पूर्ववत सुरू करण्याबाबत राज्य शासनाकडून सकारात्मक पावले उचलण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव आता मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली आहे.
बैठकीत प्रलंबित प्रश्नांवर चर्चा
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कार्यरत तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित विविध प्रश्नांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली एमएसआरडीसी कार्यालयातील निर्मल भवन येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीदरम्यान पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपसचिव अनिल धस, वित्त विभागाच्या उपसचिव मनीषा कामटे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी गजानन गुरव आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संघर्ष कृती समितीचे सरचिटणीस गजानन गटलेवार यांच्यासह विविध संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री कार्यालयाकडे प्रस्ताव सादर
कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतनाच्या संदर्भात १६ मार्च २०१७ रोजी मंत्रिमंडळाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या आधारे २३ मार्च २०१७ रोजी शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे. सध्या १७४ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतन प्रलंबित असून, यासंदर्भातील प्रकरण सोडवण्यासाठी शासन स्तरावर सकारात्मक कार्यवाही सुरू आहे. मुख्यमंत्री कार्यालयाशी योग्य समन्वय साधून आणि वित्त विभागाशी चर्चा करून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावला जाईल, असे आश्वासन राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी यावेळी दिले.
Source: Cosmo News Desk











