मुंबई | महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर आणि त्यांचे पती, नवी मुंबई शहर पोलीस सहआयुक्त दीपक साकोरे यांनी पनवेल येथील खांदा कॉलनीत असलेल्या ‘पंचदीप बालग्राम संकुल’ या बालगृहाला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी बालगृहातील मुलांसोबत काही वेळ घालवला आणि त्यांच्याशी अत्यंत आपुलकीच्या वातावरणात मनमोकळा संवाद साधला. या वेळी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला.
मुलांच्या सुविधांची केली आस्थेवाईक चौकशी
या भेटीदरम्यान राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर यांनी बालगृहातील मुलांच्या शिक्षणाविषयी, आरोग्याविषयी तसेच त्यांना प्रशासनाकडून पुरवण्यात येणाऱ्या विविध सोयी-सुविधांविषयी अत्यंत आस्थापूर्वक चौकशी केली. मुलांनीही राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधत आपल्या दैनंदिन दिनचर्येची आणि अभ्यासाची माहिती दिली. राज्यमंत्री बोर्डीकर यांनी उपस्थित सर्व मुलांना उत्तम शिक्षण घेऊन जीवनात यशस्वी होण्यासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.
माजी विद्यार्थिनीचा विशेष सत्कार
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे पूर्वी याच बालगृहात राहिलेली विद्यार्थिनी वैजयंती कदम हिने कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले होते. याबद्दल राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर यांच्या हस्ते तिचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे, सहाय्यक पोलीस आयुक्त भुजबळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढाकणे, पंचदीप बालग्रामच्या कार्याध्यक्ष मीनल टिपणीस, ‘वन स्टॉप सेंटर’च्या सरिता वाडेकर आणि ‘१०९८ चाइल्ड हेल्पलाइन’च्या नीलाक्षी दगडे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी व बालगृहातील मुले मोठ्या संख्येने उपस्थित होती.
Source: Cosmo News Desk










