मुंबई | निर्णयप्रक्रियेमध्ये बालकांचा सहभाग वाढवणे, त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण व लोकशाही मूल्यांची रुजवण करणे तसेच विकसित महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये त्यांच्या विचारांचा व सूचनांचा समावेश करणे या प्रमुख उद्देशांनुसार राज्य बाल हक्क संरक्षण आयोगातर्फे ‘महाराष्ट्र बाल संसद २०२६’चे आयोजन केले जात आहे. यशदा आणि युनिसेफ यांच्या सहयोगाने तसेच ग्रामविकास विभागाच्या सहकार्याने हा राज्यस्तरीय उपक्रम प्रथमच राबविण्यात येत असल्याची माहिती राज्य बाल हक्क व संरक्षण आयोगाच्या सदस्य सचिव वंदना जैन यांनी दिली आहे. जागतिक बाल दिनानिमित्त २० नोव्हेंबर २०२६ रोजी पुणे येथील यशदा येथे ही बाल संसद पार पडणार असून, यामध्ये राज्यातील ३४ जिल्ह्यांतील शंभरहून अधिक बालप्रतिनिधींचा सहभाग असणार आहे.
बाल संसदेची रचना आणि निवड प्रक्रिया
राज्यातील ३४ जिल्ह्यांतील १०२ नामनिर्देशित बालस्नेही ग्रामपंचायतींमधून इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची या उपक्रमासाठी निवड केली जात आहे. प्रत्येक जिल्ह्यातून तीन विद्यार्थ्यांना या संसदेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती या सहा विभागांतील बालस्नेही ग्रामपंचायती या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सहभागी आहेत. बालकांना लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, यासाठी विधानसभेच्या कामकाजाच्या धर्तीवर या बाल संसदेची रचना करण्यात आली आहे. विद्यार्थी विभागीय समित्यांमध्ये चर्चा करून बालमंत्र्यांची निवड करतील आणि त्यानंतर बाल मुख्यमंत्री व बाल सभापती यांची निवड केली जाईल. विद्यार्थी सदस्य म्हणून सहभागी झालेले बालक सभागृहात आपापल्या जिल्ह्यांतील प्रश्न मांडणार असून बालमंत्र्यांची निवेदने ऐकणे आणि प्रश्नोत्तराच्या सत्रात सहभाग घेणे यांसारख्या कामकाजात ते सहभागी होणार आहेत.
विभागनिहाय विषय आणि ‘बालकांची सनद’
बाल संसदेच्या माध्यमातून विविध सहा विभागीय समित्यांमध्ये निरनिराळ्या विषयांवर सखोल चर्चा घडवून आणली जाईल. यामध्ये पुणे विभागात शिक्षण, छत्रपती संभाजीनगर विभागात दुष्काळ, कोकण विभागात उद्योग व रोजगार, नाशिक विभागात बाल हक्क, नागपूर विभागात समाजमाध्यमे व डिजिटल पायाभूत सुविधा तर अमरावती विभागात पोषण या महत्त्वाच्या विषयांवर विद्यार्थी आपल्या सूचना मांडतील. शून्य प्रहराच्या वेळेत ३४ जिल्ह्यांतील विद्यार्थी स्थानिक समस्या सभागृहासमोर मांडणार आहेत. त्यानंतर विविध खात्यांशी संबंधित बालमंत्र्यांची निवेदने, प्रश्नोत्तराचा तास आणि मान्यवर व वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांशी संवाद सत्रे पार पडतील. बालस्नेही ग्रामपंचायत उपक्रमातून बालकांचे हक्क, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षण यांना ग्रामविकासाच्या केंद्रस्थानी आणले जात आहे. या संसदेत विद्यार्थ्यांनी मांडलेले मुद्दे, समस्या, अपेक्षा आणि शिफारशींच्या आधारे एक विशेष ‘बालकांची सनद’ तयार केली जाणार असून, ही सनद मुख्यमंत्री आणि संबंधित राज्य शासकीय विभागांना सादर केली जाईल.
Source: Cosmo News Desk










