अमरावती | महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण व ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी चुरणी येथील आदिवासी सांस्कृतिक भवनात आयोजित महिला संवाद कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी बोलताना त्यांनी एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी पालकांनी मुलींना आग्रहाने शिकवावे आणि बालविवाहाला आळा घालावा, असे आवाहन केले. शिक्षणासोबतच आर्थिक प्रगती साधून मेळघाटातील लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमास आमदार केवलराम काळे, अचलपूरच्या नगराध्यक्ष रुपाली माथने, प्रभुदास भिलावेकर, आरोग्य उपसंचालक डॉ. आरती कुलवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारीसे उपस्थित होते. स्थानिक महिला व पुरुषांनी पारंपरिक आदिवासी नृत्याद्वारे राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांचे स्वागत केले.
आरोग्य व कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी
राज्य आणि केंद्र शासनाच्या महिला व बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांमुळे मेळघाटातील महिला व बालमृत्यू दरात घट झाली असून संस्थात्मक प्रसुतीचे प्रमाण उत्तमरीत्या वाढले आहे. गरोदर महिलांना प्रसुतीपूर्व आणि पश्चात सकस आहार तसेच उत्तम आरोग्य सेवा पुरविल्या जात आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय यांच्यासह आशा आणि अंगणवाडी सेविका दुर्गम भागातघरोघरी जाऊन योजना पोहोचवित आहेत याद्वारे गरोदर माता, स्तनदा माता आणि नवजात बालकांची काळजी घेतली जात आहे. दौऱ्यादरम्यान राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी काटकुंभ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, चुरणी येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. तसेच जारीदा येथील ३३ केव्ही क्षमतेच्या वीज उपकेंद्राची पाहणी केली. चुरणी गावातील दोन अंगणवाड्या आणि आरोग्य वर्धिनी आशा उपकेंद्रालाही त्यांनी भेट दिली.
लखपती दीदी आणि मुलींच्या शिक्षणासाठी विशेष भर
राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी योजनां’ची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. महिलांना शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मुलींना मोफत उच्च शिक्षण दिले जात आहे. महिलांना वार्षिक एक ते पाच लाखांचे उत्पन्नाचे साधन मिळवून देत देशातील ३ कोटी महिलांना लखपती दीदी बनविण्याची योजना हाती घेतली आहे. राज्यातही ५० लाख लखपती दीदी बनविण्याचा निर्धार करण्यात आला असून या कार्याला अधिक गती देण्यात येईल. कार्यक्रमात आमदार काळे, नगराध्यक्ष माथने, श्री. भिलावेकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच काटकुंभ येथील साई महिला बचत गटाच्या प्रमुख सरोजनी नागले, काजलडोह येथील आशा गट प्रवर्तिका मालती उईके आणि चुरणी येथील अंगणवाडी सेविका शिला सुखदेवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
Source: Cosmo News Desk











