मुंबई | रोजगार हमी योजना, फलोत्पादन, खारभूमी विकास मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वाढत्या पाणीटंचाईवर तात्पुरत्या उपायारांऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे. मंत्रालयात आयोजित एका उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपलब्ध जलस्रोतांचा प्रभावी वापर, पायाभूत सुविधांचे बळकटीकरण आणि पाणीचोरी रोखण्यावर विशेष भर देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
या बैठकीला खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील, विरोधी पक्षनेता अरविंद म्हात्रे, आयुक्त मंगेश चितळे, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. राजा दयानिधी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. चालू वर्षात एल निनोच्या प्रभावामुळे पाऊस कमी झाला असून, वाढत्या तापमानामुळे जलसाठ्यांवर परिणाम होत आहे. भविष्यातील संकट टाळण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने न्हावा शेवा योजना टप्पा ३ ची उर्वरित कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असेही मंत्र्यांनी नमूद केले.
पाणीचोरी रोखण्यावर आणि समन्वयावर भर
पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणांनी आपापसात समन्वय साधून काम करावे, असे आवाहन पालकमंत्री गोगावले यांनी केले. लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांच्या आधारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच एक स्वतंत्र बैठक बोलावण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पाणीटंचाईच्या काळात पाणीचोरीला आळा घालणे अत्यंत गरजेचे असून, मुख्यमंत्र्यांनीही याबाबत स्पष्ट निर्देश दिल्याची आठवण त्यांनी करून दिली.
टँकरद्वारे पाणीपुरवठा करताना नागरिकांना कुठल्याही त्रासाला सामोरे जावे लागू नये, याची संपूर्ण दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रशासनाने केवळ टँकरवर अवलंबून न राहता पाणीसाठवणूक, वितरण यंत्रणा आणि पर्यायी जलस्रोतांचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे, असे त्यांनी या बैठकीत अधोरेखित केले.
Source: Cosmo News Desk











