नागपूर | भारतातील प्राचीन शिक्षण व्यवस्था अत्यंत महान असून तक्षशिला, नालंदा आणि विक्रमशिलासारख्या विद्यापीठांमध्ये जगभरातून विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी येत असत. या प्राचीन ज्ञानाच्या जोरावर भारत जागतिक व्यापार, जीडीपी आणि निर्यातीत आघाडीवर होता. वर्तमानात दिशादर्शक ठरणाऱ्या या प्राचीन शिक्षण व्यवस्थेचा वारसा जपणे हे नवीन पिढीची मोठी जबाबदारी आणि काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
आंतरराष्ट्रीय प्राचार्य शैक्षणिक परिषदेचा समारोप
मिहान येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये (आयआयएम) आयोजित ९ व्या आंतरराष्ट्रीय प्राचार्य शैक्षणिक परिषदेच्या समारोपीय सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमास शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर आणि माजी खासदार डॉ. नितीश भारद्वाज यांची विशेष उपस्थिती होती. तसेच आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी आचार्य चाणक्य आणि पाणिनी यांच्या ग्रंथांचे दाखले देत मुख्यमंत्री म्हणाले की, पूर्वीची शिक्षण प्रणाली शास्त्र व संवाद स्वरूपात होती. ज्ञान केवळ सैद्धांतिक नसून उपयोजित व कौशल्य-आधारित होते.
माहितीचे ज्ञानात रूपांतर करण्याचे आव्हान
सध्याच्या माहितीच्या स्फोटाच्या युगात ‘जनरेशन वॉव’ (वर्ल्ड ऑफ वंडरफुल जनरेशन) ही नवी संकल्पना समोर आली असून, या पिढीसमोर माहितीचे ज्ञानात रूपांतर करण्याचे मोठे आव्हान आहे. शिक्षकांची भूमिका विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यापेक्षा त्यांच्या विचार प्रक्रियेला आकार देण्याची असली पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले. कार्यक्रमात ‘पाथेय – द गोल्डन एलिक्सिर’ या ई-स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘नचिकेता’ आणि ‘सुपर नचिकेता’ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनीही आपले विचार व्यक्त केले.
Source: Cosmo News Desk











